अटक केलेला गुन्हेगार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे कॅम्प पोलिस स्थानकाच्या निरीक्षकांसह 14 पोलिसांना काॅरंटाईन करण्याबरोबर हे पोलीस स्थानक सील डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या सूचनेनुसार येथील कामकाज आता पोलीस स्थानक इमारतीबाहेर उघड्यावर सुरू आहे.
पोलीस अधिकार्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना काॅरंटाईन करण्याबरोबरच कॅम्प पोलीस स्थानक सील डाऊन करण्यात आल्यामुळे सध्या येथील व्यवहार स्थानकाबाहेरच सुरू आहेत. स्थानकासमोर तात्पुरत्या शेडची उभारणी करून तक्रारी मांडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी त्या ठिकाणी खुर्च्या मांडण्यात आल्या आहेत. प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांकडून नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन पोलीस स्थानकाबाहेरच त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कॅम्प पोलिस स्थानकाच्या प्रवेशद्वारातच उघड्यावर हा सर्व कारभार सुरू आहे.
सध्या कॅम्प पोलिसांकडून छोटीमोठी भांडणे व किरकोळ तक्रारीसंदर्भात दूरध्वनीवरून संपर्क साधून समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गंभीर स्वरूपाचा गुन्हा अथवा एखादे प्रकरण आढळून आले तरच प्रत्यक्ष सहभाग दर्शवून गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोनाचे संकट अधिक गडद झाल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार कॅम्प पोलिसांनी वरीलप्रमाणे आपली कार्यपद्धत बदलली आहे.