सध्या कोरोनाचे संकट गडद झाले असले तरी या रोगाखेरीज शहर उपनगरातील तातडीने उपचाराची गरज असणाऱ्या अन्य गंभीर व्याधीग्रस्त रुग्णांसाठी शहरातील दोन हॉस्पिटल उपलब्ध करून दिली जावीत, अशी मागणी शहरातील नागरिकांनी “हेल्प फाॅर नीडी” संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
हेल्प फाॅर नीडी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. बेळगाव शहर आणि उपनगरातील जे नागरिक गंभीर आजारी आहेत, ज्यांना उपचाराची तात्काळ गरज आहे अशांवर शहरात कोठेही उपचार मिळेनासे झाले आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील दोन हॉस्पिटलं तातडीच्या उपचाराची गरज असणाऱ्या रुग्णांसाठी उपलब्ध करून द्यावीत.
संबंधित हॉस्पिटलमधील तपासणीत एखादा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला तरच त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविले जावे. त्याचप्रमाणे खासगी हॉस्पिटलमध्ये मनमानी दर आकारले जात आहेत.
या मनमानीला तात्काळ आळा घातला जावा आणि सरकारने या हॉस्पिटल्सवर आपला अंकुश ठेवावा, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
आपल्या मागण्यांसंदर्भात हेल्प फाॅर नीडीचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांनी प्रसारमाध्यमांना अधिक माहिती दिली. त्याचप्रमाणे अलीकडेच निधन पावलेले समितीचे नेते वाय. बी. चौगुले यांची कन्या मानसी चौगुले हिने याप्रसंगी बोलताना वेळेवर उपचार उपलब्ध न झाल्यामुळे आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. रात्रीच्या वेळी आपल्या वडिलांची प्रकृती गंभीर झाली त्यावेळी शहरातील कोणतेही हॉस्पिटल त्यांच्यावर उपचार करण्यास तयार नव्हते, असे तिने स्पष्ट केले. उपरोक्त निवेदन सादर करतेवेळी बरेच नागरिक व महिला उपस्थित होत्या.