रात्रीच्या वस्तीच्या बसगाड्या सर्वांसाठी सुपरिचित आहेत. मात्र आता “वस्तीची विमाने” या शब्दप्रयोगाची सवय यापुढे बेळगांववासियांना करून घ्यावी लागणार आहे. कारण बेळगाव विमानतळावर स्टार एअर कंपनीची दोन विमाने रात्रीच्या मुक्कामाला थांबून राहणार आहेत, म्हणजे रात्री “पार्क” केली जाणार आहेत.
स्टार एअर कंपनीची आत्तापर्यंत एकूण दोन विमाने बेळगाव विमानतळावरून कार्यरत होती. मात्र आता या कंपनीचे आणखी एक विमान कार्यरत होत आहे. यापूर्वी स्टार एअरच्या दोन विमान पैकी एक विमान दुसऱ्या दिवशीच्या उड्डाणासाठी बेळगाव विमानतळावर रात्रीच्यावेळी पार्क केले जात होते.
आता आपल्या तिसऱ्या विमानासाठी स्टार एअर कंपनीने बेळगाव विमानतळाकडे रात्रीच्या पार्किंगसाठी परवानगी मागितली आहे. विमानतळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार मौर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार स्टार एअरच्या तिसऱ्या विमानाला पार्किंगची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बेळगाव विमानतळावर रात्रीच्या वेळी दोन विमाने मुक्कामाला असणार आहेत. स्टार एअर कंपनीला बेळगाव येथून सुरत, जोधपुर, जयपुर व नासिक या शहरांसाठी विमान सेवा सुरू करायची असल्यामुळे त्यांनी आपल्या विमान संख्येत वाढ केली असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, कोरोना प्रादुर्भावामुळे बेळगाव विमानतळावरून सध्या बेंगलोर, इंदोर, अहमदाबाद, मुंबई, पुणे हैदराबाद व म्हैसूर या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. यापैकी म्हैसूर व हैदराबाद या शहरांसाठीची ट्रू जेट विमान कंपनीची सेवा ही दैनंदिन विमानसेवा आहे. सध्या बेळगाव विमानतळावरून इंडिगो, स्टार एअर, स्पाईस जेट, ट्रू जेट व एअर इंडिया या कंपन्यांची विमाने कार्यरत आहेत. स्पाईस जेट ही कंपनी येत्या मंगळवार दि. 14 जुलैपासून बेंगलोर शहरासाठीची आपली विमान सेवा सुरू करणार आहे.
स्टार एअर कंपनीच्या तिसऱ्या विमानामुळे बेळगाव विमानतळावरील फ्लाइट ऑपरेशन्स आणखी वाढणार आहे. तसेच रात्रीच्या मुक्कामाला विमानतळावर पार्क केले जाणारे हे विमान प्रवाशांसाठी आणखी सोयीचे ठरणार आहे. एकंदर बस स्थानकावरील रात्रीच्या “वस्तीच्या बस” गाड्यांप्रमाणे विमानतळावरील “वस्तीची विमानं” ही प्रथा आता बेळगाव देखील सुरू होणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वस्तीच्या विमानाने मी उद्या प्रवासाला निघणार! असे वाक्प्रचार यापुढे बेळगाववासियांना ऐकावयास मिळणार आहेत.
Congratulations chan, mahatvachi baatmi