बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक पार पडली. यावेळी कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार बकरी ईदचे आचरण करावे असे जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी यावेळी सांगितले.
३१ जुलै तसेच काही ठिकाणी १ ऑगस्ट रोजी बकरी ईद साजरी केली जाणार आहे . या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुस्लिम समाजातील मान्यवर, अधिकारी या सभेमध्ये सहभागी झाले होते. यावेळी कोविड पार्श्वभूमीवर होणाऱ्या बकरी ईद बद्दल चर्चा करण्यात आली. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नमाज तसेच इतर धार्मिक विधींबाबत खबरदारी घेण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.
बेळगाव जिल्ह्यात ईदगाह मैदानावर बकरी ईदच्या निमित्ताने सामूहिक नमाज पठण करण्यास बंदी घालण्यात आली आहे . राज्य सरकारच्या मार्गसूचीनुसार मशिदींमध्ये ठराविक लोकांना नमाज पठण करण्यास परवानगी देण्यात आली आहे .
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ म्हणाले कि, राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव जास्त प्रमाणात वाढला आहे . त्यामुळे ईदगाह मैदानावर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी सामूहिक नमाज पठणास बंदी घालण्यात आली आहे .तसेच सरकारच्या मार्गसूचीनुसार केवळ ५० लोक मशिदीमध्ये नमाज पठण करु शकतात . ५० पेक्षा अधिक लोक असतील तर त्यांनी बॅच ठरवून त्यानुसार नमाज पठाण करावे. मशिदीत प्रवेश करण्यापूर्वी थर्मल स्क्रीनिंग, मास्क परिधान करणे अनिवार्य आहे . ६० वर्षांपेक्षा जास्त आणि १० वर्षांखालील मुलांना मशिदीत प्रवेश करण्यासाठी सक्त मनाई आहे. तसेच इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांनाही मशिदीत प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली आहे. हे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्यात यावे, नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईस अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
या बैठकीला शहर पोलीस आयुक्त डॉ . त्यागराजन , जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी, अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पालिका आयुक्त जगदीश के. एच , अंजुमन-ए-इस्लाम चे अध्यक्ष राजू सेठ , वक्फ बोर्डाचे चेअरमन गफूर घीवाले , एसीपी नारायण बरमनी, एसीपी चंद्रप्पा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.