राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात राज्यात आणखी 1,839 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून तब्बल 42 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार दि. 4 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 21,549 इतकी झाली असून कोरोनामुळे राज्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 335 झाली आहे. बेळगाव जिल्ह्यात नव्याने 27 रुग्ण आढळल्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 383 इतकी वाढली आहे.
बेळगाव जिल्ह्यात काल सायंकाळपासून नव्याने 27 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 27 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश रुग्ण महाराष्ट्र रिटर्न आहेत. गेल्या 24 तासात जिल्ह्यात आढळून आलेल्या 27 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 12 रुग्ण अथणी तालुक्यातील असून बेळगाव शहर व तालुक्यातील 11 जण आहेत. त्याचप्रमाणे सौंदत्ती तालुक्यातील तिघासह खानापूर तालुक्यातील एकाचा या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये समावेश आहे. बेळगाव तालुक्यातील जिल्हा सशस्त्र दल अर्थात डीएआरच्या 3 पोलिस कॉन्स्टेबल्सना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या तिघांसह शहरातील माळी गल्ली येथील एक महिला, करवीनकोप्प (ता.खानापूर) येथील एक जवान, शेडबाळ (ता. कागवाड) येथील एकाच कुटुंबातील पाच जण आणि बेळगाव खासबाग येथील एक महिला आदींचा आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये समावेश आहे
राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार दि. 3 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज शनिवार दि. 4 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 1,839 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 21,549 झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 11,966 असून यापैकी 226 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात शनिवारी 439 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 9,244 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 42 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 335 झाली असून यापैकी चौघांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.
कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून त्यापैकी बागलकोट चित्रदुर्ग व कोडगु जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी पहिल्या तीन क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये आज सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 1172 रुग्ण – एकूण रुग्ण 8345), मंगळूर (75-1087), बेळ्ळारी (73-1154), आणि बेळगाव (27-383).