पुढील काही दिवसात बेळगाव ग्रामीण मतदारसंघात मी सक्रीय होणार असून तो मतदारसंघ मी सोडणार नाही अशी प्रतिक्रिया पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी गोकाक येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली आहे.
लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मला सवाल केलेला नाही.त्यांनी आपल्या पक्षाच्या वतीने मत व्यक्त केले आहे.आमच्या पक्षाच्याबाबत मी बोललो आहे.एक लोकप्रतिनिधी म्हणजे काही मर्यादा असायला पाहिजे. आमदार म्हणजे काही आम्ही आकाशातून आलो नाही.पक्ष कोणताही असो आम्ही येथे जनतेचे प्रतिनिधी आहे हे ध्यानात ठेवायला पाहिजे असा टोलाही रमेश जारकीहोळी यांनी लगावला.
दोन दिवसांपूर्वी तालुका पंचायतीच्या विकास आढावा बैठकीत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाजप आणि मोदींवर टीका केली होती.त्यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झडली होती.त्यावेळी रमेश जारकीहोळी यांनी देखील आपली मते मांडली होती.
आता पुढील काळात बेळगाव ग्रामीण मतदारसंघात शह काटशहाचे राजकारण रंगणार एव्हढे मात्र नक्की आहे.
पुढील महिन्यात होणाऱ्या डी सी बँकेच्या निवडणुकीत रमेश जारकीहोळी यांनी जिल्ह्याची सूत्रे जरी उमेश कत्ती आणि भालचंद्र जारकीहोळी यांच्याकडे दिली असल्याचे म्हटले असले तरी बेळगाव तालुक्याच्या बाबतीत ते स्वतः आक्रमक असतील अशी चिन्हे दिसत आहेत.बेळगावच्या ग्रामीण भागातून विद्यमान आमदारांनी आपल्या भावाला रिंगणात उतरवण्यासाठी तयारी चालवली असताना रमेश जारकीहोळी यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे.
मागील वर्षी पी एल डी बँकेत मराठी सदस्यांनी घोडेबाजार करत आर्थिक व्यवहार केला होता तसे आरोपही झाले होते त्याचाच कित्ता आता डी सी सी बँक निवडणुकीत उतरवणार का? हा मुख्य प्रश्न उपस्थित झाला आहे.