कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी एपीएमसीने दिलेल्या सूचनेनुसार शहरातील तीनही ठिकाणचे भाजी मार्केट दर गुरुवारी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यानुसार आज गुरुवारी ऑटोनगर आणि हिंडाल्को येथील भाजी मार्केट बंद ठेवण्यात आल्यामुळे येथे शुकशुकाट पसरला होता. तथापि भाजी मार्केट बंदची जाहीर घोषणा करण्यात आली नसल्यामुळे शेतकऱ्यांची मात्र मोठी गैरसोय झाली.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन अलीकडे एपीएमसीमधील भाजी मार्केट ऑटोनगर, हिंडाल्को आणि अलारवाड क्रॉस येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र पहिल्या पावसातच वादळी वाऱ्यामुळे अलारवाड क्रॉस येथील भाजी मार्केटचे पत्रे उडून जाऊन मार्केटची पार दुर्दशा झाली होती. परिणामी तेथील भाजी मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. हिंडाल्को आणि ऑटोनगर येथील भाजी मार्केट मात्र नियमित सुरू होते. त्याठिकाणी बर्याच गैरसोयी असल्या तरी व्यापारी व शेतकऱ्यांनी त्याला तोंड देत आपला व्यवसाय सुरु ठेवला होता.
सध्या परराज्यातून येणाऱ्या नागरिकांमुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्याची गंभीर दखल घेऊन सरकारने विविध उपाय योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. यापैकीच एक खबरदारीचा उपाय म्हणून दर गुरुवारी भाजी मार्केट बंद ठेवण्याची सूचना एपीएमसीने भाजी व्यापाऱ्यांना दिली आहे. त्यानुसार आज गुरुवारी भाजी मार्केटमधील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. मात्र नागरिकांना विशेष करून शेतकऱ्यांना याबाबत कोणतीच कल्पना देण्यात आली नसल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय झाली. भाजी व्यापारी व विक्रेत्यांनी कांही शेतकऱ्यांना मार्केट बंद असल्याबद्दल कळविले होते.
तथापि माहिती नसलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाला मार्केटमध्ये आणल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय झाली. मार्केटमध्ये आणलेला भाजीपाला उतरवून घेण्यासाठी हमाल देखील नसल्यामुळे भाजी घेऊन येणाऱ्या वाहन चालकालाच भाजीपाला मार्केटमधील दुकानांसमोर नेऊन ठेवावा लागला. त्यामुळे गुरुवारी हिंडाल्को आणि ऑटोनगर येथील भाजी मार्केटमध्ये भाजीपाला पडून होता. भाजी मार्केट मधील सर्व व्यवहार ठप्प असल्यामुळे याठिकाणी शुकशुकाट पसरलेला दिसत होता.