गेल्या कांही दिवसांपासून ज्या चिक्कमंगळूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला नव्हता त्या जिल्ह्यातील काडूर तालुक्यातील के. दासरहळ्ळी या गावांमध्ये एका 15 वर्षीय मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे. सदर मुलगा हा दहावीचा (एसएसएलसी) विद्यार्थी असल्याने या घटनेला गांभीर्य प्राप्त झाले आहे.
यंदा एसएसएलसी परीक्षेस बसणाऱ्या संबंधित कोरोनाबाधित विद्यार्थ्याला जिल्ह्यातील मान्यताप्राप्त हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रायमरी कॉन्टॅक्टना अर्थात त्याच्या प्राथमिक संपर्कात आलेल्या 55 जणांना काॅरन्टाईन करण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे दासरहळ्ळी गाव सील डाऊन करण्यात आले आहे. गेल्या 19 मे रोजी चिकमंगळूर जिल्ह्यात मूडगिरी येथील एक डॉक्टर आणि एक गर्भवती महिला कोरोना बाधित आढळून आले होते. त्यानंतर या जिल्ह्यात 19 जण कोरोनाबाधित आढळून आले होते. यापैकी बहुतांश रुग्ण दिल्ली आणि मुंबई रिटर्न होते.
या सर्वांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेला आहे. यापद्धतीने चिक्कमंगळूर जिल्ह्यात गेल्या कांही दिवसांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसताना संबंधित एसएसएलसीचा विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.