शास्त्रीनगर येथील संतसेना रोड या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर सध्या साचलेले पावसाच्या पाण्याचे तळे त्रासदायक ठरत असल्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची जोरदार मागणी होत आहे.
गेले तीन दिवस पडलेल्या पावसामुळे शास्त्रीनगर येथील संत सेना मंदिर रोडच्या विरुद्ध बाजूस असलेल्या संतसेना रोड या रस्त्यावर पावसाच्या गढूळ पाण्याचे मोठे तळे साचले आहे. या रस्त्याची आधीच पूर्णपणे दुर्दशा झालेली आहे. आता सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे.
या रस्त्यावर इतके पाणी साचले आहे की रस्ता कुठे आहे हे शोधावे लागत आहे. पाणी साचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी बरेच खड्डे असल्यामुळे वाहन चालक विशेषकरून दुचाकी वाहन चालक रस्त्याच्या कडेने आपली वाहने हाकत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना आपण कोठून जायचे असा प्रश्न पडू लागला आहे. रस्त्याच्या कडेने पादचारी येत असल्यास दुचाकी वाहन चालकांची ही द्विधा मनस्थिती होत आहे. एखाद्या वाहन चालकाने रस्त्यावरील या पाण्यातून वेगाने वाहन हाकल्यास पादचाऱ्यांचे कपडे गढूळ पाण्याने रंगून जात आहेत.
एकंदर रस्त्यावरील हे पाण्याचे तळे संतसेना रोड या रस्त्यावरील रहिवाशांसाठी त्रासदायक मनस्तापाचे ठरत आहे. तरी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सदर रस्त्याची त्वरित दगड-मातीचा भराव वगैरे टाकून व्यवस्थित दुरुस्ती करावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.