ग्रामीण भागातील रस्त्यांची तात्काळ डागडुजी करावी स्वतः पालक मंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन ग्रामीण भागातील समस्या सोडवाव्यात अशी मागणी करत जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी रमेश जारकीहोळी यांना विनंती केली आहे.
न्यू एपीएमसी मार्केट ते कंग्राळी खुर्द गावापर्यंतचा रस्ता नव्याने तयार करण्याबरोबरच बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील खराब झालेले रस्ते पावसाळा सुरू होण्यापूर्वी व्यवस्थित दुरुस्त केले जावेत. त्याचप्रमाणे दहावीची परीक्षा विद्यार्थी ज्या गावातील असतील त्या – त्या गावातच घेतली जावी, अशा मागणीचे निवेदन आज शुक्रवारी सकाळी जि. पं. सदस्य सरस्वती पाटील यांनी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांना सादर केले.
बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील खराब झालेले रस्ते पावसाळ्यापूर्वी व्यवस्थित दुरुस्त केले जावेत त्याचप्रमाणे दहावीच्या परीक्षेचे संदर्भातील जि. पं. सदस्य सरस्वती पाटील यांनी सादर केलेले निवेदन जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी स्वीकारुन लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन दिले. न्यू एपीएमसी मार्केट ते कंग्राळी खुर्द गावापर्यंतचा रस्ता नव्याने तयार केला जावा. तसेच बेळगाव तालुक्यातील हिंडलगा मार्कंडेय ब्रिज ते मण्णूर, हिंडलगा ते बाचीपर्यंतचा वेंगुर्ला रोड आणि वेंगुर्ला रोड ते उचगाव पर्यंतचा रस्ता या सर्व रस्त्यांची दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जावीत. सध्या या सर्व रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्त्यांवर लहान – मोठे खड्डे पडण्याबरोबरच ठिकठिकाणी रस्ता उखडलेला असल्यामुळे वाहनचालकांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. खराब रस्त्यामुळे याठिकाणी सातत्याने लहान-मोठे अपघात घडत असतात. आता पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात तर रस्त्यांची अधिकच दुर्दशा होऊन हे रस्ते मृत्यूचा सापळा ठरण्याची शक्यता आहे. सध्या यापैकी काही रस्त्यांची कामे अर्धवट झाली आहेत. तेंव्हा याप्रकरणी तात्काळ लक्ष घालून उपरोक्त रस्ते पावसाळ्यापूर्वी व्यवस्थित तयार करून रहदारीस अनुकूल करण्याचे आदेश दिले जावेत.
त्याचप्रमाणे येत्या 25 जूनपासून एसएसएलसी अर्थात दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील सुळगा (हिं), अतवाड, कुद्रेमानी, तुरमुरी व बसूर्ते या गावातील दहावीच्या मुलांसाठी उचगाव हे परीक्षा केंद्र आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रत्येक गावांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले आहे. चिंतेची बाब ही आहे की वरील गावांपैकी काही गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे संबंधित गावातील विद्यार्थी तसेच अन्य गावातील विद्यार्थी परीक्षेत परीक्षा केंद्राच्या ठिकाणी एकत्र आल्या प्रादुर्भावाचा धोका वाढणार आहे. यासाठी दहावीची परीक्षा विद्यार्थी या गावातील असतील त्या त्या गावामध्येच घेतली जावी. या मागण्याची गांभीर्याने दखल घेऊन त्याप्रमाणे तात्काळ कार्यवाही करावी ही विनंती, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.