कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव अद्यापही सुरू आहे. नियम पाळले जात नसल्यामुळे एपीएमसी मार्केट बंद झाले आणि आता अलीकडे पूर्ववत सुरू झाले. परंतु आता या ठिकाणच्या कांदा मार्केटमध्ये पुन्हा सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होण्याचा प्रकार घडत असून प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
बेळगावची कृषी उत्पन्न बाजार पेठ अर्थात बेळगाव एपीएमसी मार्केट ही उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठी भाजीपाला खरेदी विक्रीची बाजारपेठ आहे. या मार्केटमध्ये होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे कोरोना प्रादुर्भावाच्या प्रारंभीच्या काळात कोरोनाला रोखण्यासंदर्भातील नियमांचे याठिकाणी अनावधानाने उल्लंघन होत होते. यावर पर्याय म्हणून जिल्हा प्रशासनाने विखुरलेल्या स्वरुपात हे भाजी मार्केट सुरू केले. लॉक डाऊन शीथली करण्याच्या काळात आता पुनश्च हे भाजी मार्केट सुरू झाले आहे.
एपीएमसी भाजी मार्केट पुनश्च सुरू झाले असले तरी या ठिकाणच्या कांदा खरेदी विक्री विभागाच्या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या ठिकाणी सध्या कोरोना संदर्भातील नियमांचे खुलेआम उल्लंघन होत आहे.
सोशल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडवून कांदा खरेदीसाठी याठिकाणी झुंबड उडाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तेंव्हा प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन या ठिकाणचा खरेदी-विक्रीचा व्यवहार सध्याची संसर्गजन्य परिस्थिती लक्षात घेऊन निर्धोक व्हावा या अनुषंगाने कार्यवाही करावी, अशी मागणी कांदा भाजी मार्केटमधील अनुभवी जाणकार मंडळींकडून केली जात आहे.