निपाणी शहर परिसरातील ओढे-नाले निर्माल्य, केरकचरा, प्लास्टिक आदींनी भरून गेले आहेत. तेंव्हा संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी पावसाळ्याला प्रारंभ होण्यापूर्वी या ओढेनाल्यांची तात्काळ युद्धपातळीवर साफसफाई केली जावी, अशी जोरदार मागणी समस्त निपाणीवासियांसह शेतकऱ्यांनी केली आहे.
निपाणी शहर परिसरातील ओढे-नाले प्लास्टिक, निर्माल्य, जुने कपडे, जुन्या इमारतींची दगड-माती आदी टाकाऊ साहित्यांनी भरलेले आहेत. विशेषता श्री विरुपाक्ष समाधी मठानजीकचा ओढा, चिकोडी रोड रामपूर ओढा, बागवान ओढा इत्यादी ओढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केरकचरा व टाकाऊ वस्तू टाकण्यात आल्यामुळे बघणाऱ्याला ओढा आहे की गटार? असा प्रश्न पडतो.
दरम्यान, ओढा मुजला तरी चालेल पण माझी जमिनीची हद्द वाढत जाऊ देत, ही मनोकामना बाळगून कांही स्वार्थी लोकांनी रस्ता रुंदीकरणाप्रसंगी ओढ्यात मुरूम-माती टाकून ओढा आपल्या हद्दीत घेतल्याचे प्रकार घडले आहेत. परिणामी 25 ते 30 फूट रुंदीचा ओढा गटारा सारखा दिसत आहे. चिकोडी रोडच्या बाजूचे ओढे तर इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत. यापूर्वी पत्रकारांनी याबाबत आवाज उठवून शासनाचे लक्ष वेधले होते. तथापि प्रत्यक्षात अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली नाही
बागवान गल्लीतील ओढा व समाधी मठ सुतार ओढा म्हणजे तर कचराकुंड झाला आहे. नागरिक याठिकाणी घरातील अनावश्यक अडगळीचे सामान, मयत व्यक्तींचे कपडे, अंथरून -पांघरून, दगडधोंडे, तुटक्या चपला इत्यादी साहित्य खुलेआम टाकत असतात. या परिसरात मठ, मंदिरे आहेत. यंदा पावसाळा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. या परिस्थितीत दुर्दैवाने महापूरासारखी परिस्थिती निर्माण झाली तर निपाणी परिसरातील शेतीसह नागरिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका आहे. तेंव्हा हा धोका टाळण्यासाठी निपाणी शहर परिसरातील ओढे, नाले स्वच्छ करून येत्या पावसाळ्यात त्यामधून पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल, त्याचप्रमाणे पर्यावरणाचा समतोल साधला जाईल, या दृष्टिकोनातून तात्काळ संबंधित ओढे व नाल्यांची स्वच्छता मोहीम हाती घेतली जावी.
पूरपरिस्थिती आणि त्यानंतर नुकसानभरपाई देणे घेणे या भानगडी पेक्षा ओढे-नाले पावसाळ्यापूर्वी कसे स्वच्छ होतील याकडे निपाणी नगरपालिकेने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधींनीही गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विभागाला तात्काळ आवश्यक ते आदेश द्यावेत. किमान शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तरी प्रशासनाने ओढे -नाले सफाईच्या कामाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन माजी सभापती प्रा. राजन चिकोडे यांनी केले आहे.