शहरातील काही वित्तसंस्था कर्जवसुलीसाठी कर्जदारांना मोठ्या प्रमाणात त्रास देत आहेत. तेंव्हा सद्य परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित वित्तीय संस्थांवर तात्काळ कडक कारवाई करून कर्जदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली सदर मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम झाला आहे. उद्योगधंदे व्यवसाय आदी सर्व क्षेत्रे कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे आर्थिक संकटात सापडली आहेत. परिणामी सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम झालेला आहे सध्या प्रत्येक जण आर्थिक संकटाला तोंड देत आहे. सद्यपरिस्थितीत बऱ्याच जणांना आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविणे कठीण झाले आहे.
ही वस्तुस्थिती असताना आणि सरकारने कर्ज वसुलीसाठी नागरिकांना वेठीस धरू नये, अशी सूचना केलेली असताना देखील वित्त संस्थांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. कर्जवसुलीसाठी कर्जदारांवर जबरदस्ती केली जात आहे. यामुळे कर्जदारांवर आत्मघाती वेळ येण्याची शक्यता आहे. तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित वित्त संस्थांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कर्ज वसुलीसाठी कर्जदारांना वेठीस धरले जाऊ नये अशी सरकारची सक्त सूचना असतानादेखील कांही वित्त संस्थांकडून नागरिकांना वेठीस धरले जात आहे. ही अत्यंत चुकीची बाब असून वित्तसंस्थांच्या त्रासाला कंटाळून एखाद्याने स्वतःचे बरेवाईट करून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतांश कर्जदार व्याज भरण्यास तयार असताना देखील त्यांना चक्र व्याज लावून ते तात्काळ भरण्यासाठी दबाव आणला जात आहे. हा प्रकार यापुढे असाच सुरू राहिल्यास आम्ही आमच्या संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी यावेळी “बेळगाव लाईव्ह”शी बोलताना दिला
निवेदन सादर करतेवेळी अध्यक्ष अध्यक्ष शुभम शेळके यांच्यासह कार्यकारी अध्यक्ष धनंजय पाटील, उपाध्यक्ष संतोष कृष्णाजीचे, सरचिटणीस श्रीकांत कदम यांच्यासह युवा समितीचे सदस्य आणि कर्जदार बंधू-भगिनी उपस्थित होते.