महाद्वार रोड, बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील. तब्बल 110 वेळा रक्तदान करणारे रक्तदाते म्हणून परिचित असणारे संजय पाटील यांनी प्रामाणिक सेवभावाने समाजात आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे.
या कार्यकर्त्याने नुकतेच माणुसकीचे दर्शन घडविले. रस्त्याशेजारी एखाद्या आडोशाला पडून कसेबसे दिवस काढणाऱ्या एका वयस्कर व्यक्तीला संजय यांनी नवजीवन दिले.
शंकर रामचंद्र क्षीरसागर नामक सुमारे 60 वर्षीय वृद्ध व्यक्ती मागील महिन्यां भरापासून खासबाग ( बेळगाव) बसवेश्वर सर्कल येथील एका दुकानाच्या आडोशाला पडून दिवस काढत होती.
संजय पाटील हे मनपा मध्ये प्रभाग स्वच्छता विभागात कार्यरत आहे खासबाग येथे गेले असता त्यांची नजर पावसात कुडकुडत पडलेल्या या व्यक्तीकडे संजय पाटील यांचे लक्ष गेले. त्या व्यक्तीची परिस्थिती पाहून संजय यांना रहावले नाही. त्यांनी त्वरित येथील युवा सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांच्याशी संपर्क साधून त्यांची मदत घेतली.
विजय जाधव यांनी युवा समितीच्यावतीने वितरित करण्यात येत असलेले एक ब्लँकेट संजय पाटील यांच्याकरवी त्या वयोवृद्ध व्यक्तीस दिले.संजय पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी त्या वृद्धास घेऊन कटिंग दुकानांच्या पायऱ्या झिजविल्या. मात्र, त्या वृद्धांची स्थिती आणि कोरोनाच्या भीतीने सलून धारकांनी त्या वृद्धाची कटिंग-दाढी करण्यास नकार दिला. अनेक दुकानांची पायपीट केल्यानंतर एका सलून चालकाने त्या वृद्धांची कटिंग-दाढी केली.
यानंतर संजय यांनी त्या वृद्धास अंघोळ घातली आणि सामाजिक कार्यकर्ते परशराम अनगोळकर यांच्याकडून शर्ट- पॅन्ट मागून घेऊन ते त्या वृद्धास परिधान करण्यास दिले.
आता त्याच्या राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा प्रश्न होता. त्यांनी त्या वृद्धास नाथ पै सर्कल येथील इंदिरा कँटीन येथे नेऊन त्यास पोटभर जेवू घातले. तसेच पुढील महिनाभर दोन वेळचे जेवण आणि सकाळचा नाश्त्याची स्वखर्चाने सोय करून दिली. यानंतर त्यांनी गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळी संचलित सिद्धार्थ बोर्डिंग या आश्रमात जाऊन नंदीहळी यांच्याकडे विनंती करून त्या वृध्दाच्या राहण्याची सोय सिद्धार्थ आश्रमात केली.
संजय पाटील यांनी माणुसकीचे दर्शन घडवत रस्त्याकडेला थंडी- पावसात दिवस काढणाऱ्या त्या वृद्धाला नवजीवन दिले. त्यांच्या या सेवकार्याचे परिसरात कौतुक होत आहे.
या कामी त्यांना युवा समितीचे विजय जाधव, किरण हुद्दार, आणि सामाजिक कार्यकर्ते परशराम अनगोळकर यांचे सहकार्य लाभले.