गुंजी तालुका खानापूर येथे रात्री नऊच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना रेल्वेच्या धडकेत दोन गव्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली आहे. रेल्वेची जोरदार धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे गुरुवारी पहाटे गव्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. याची माहिती वन खात्याला देण्यात आली. लोंढा विभागात अधिकारी प्रशांत गौराणी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
गुंजी परिसरात गवी रेड्यांची संख्या अधिक आहे. अन्न पाण्याच्या शोधात गवी रेडे फिरत असतात. अनेक वेळा ते रस्ता किंवा रेल्वे रूळ ओलांडत असतात. मात्र बऱ्याच वेळा रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेची धडक बसून त्यांना आपला जीव गमवावा लागतो. वारंवार अशा घटना घडत असतात. त्यामुळे याबाबत थोडा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकारी अमरनाथ करुणाकर, प्रशांत गौराणी, गुंजी विभागाचे राजू पवार, वनकर्मचारी विनायक आदींनी पंचनामा केला. त्यानंतर गुंजी येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चरंतीमठ यांनी दोन्ही गवी रेड्यांचे शवविच्छेदन करून पंचनामा केला आहे.
अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे रेल्वे विभागानेही ही या परिसरातून जाताना रेल्वे सावकाश सोडावी अशी मागणी होत आहे.