शहरातील कोल्हापूर क्राॅस नजीकच्या एस. पी. ऑफीस रोड क्रॉस नंबर 2 या परिसरातील डेंग्यू डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना केली जावी, अशी जोरदार मागणी स्थानिक रहिवासी संज्योती पानारे यांनी केली आहे.
कोल्हापूर क्राॅस नजीकच्या एस. पी. ऑफीस रोड क्रॉस नंबर 2 येथील रहिवासी व जागरूक नागरिक संज्योती पानारे यांनी महापालिकेच्या आरोग्य अधिकार्यांना उपरोक्त मागणीचे निवेदन दिले आहे. माझ्या अनुक्रमे 17 व बारा वर्षाच्या मुलांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांना चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे त्याचप्रमाणे आमच्या रखवालदाराच्या मुलाला देखील डेंग्यू झाला आहे. एकंदर महापालिका कार्यालय नजीक असणाऱ्या आमच्या घराच्या आवारातील तिघाजणांना डेंग्यूची लागण झाली आहे. आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांच्या कुटुंबाची स्थिती काय आहे हे मला माहीत नाही. माझ्या मोठ्या मुलाला डेंग्यूचा ताप येण्याची ही दुसरी वेळ असल्यामुळे मला प्रचंड काळजी लागली आहे.
कोल्हापूर क्रॉस नजीकच्या शिवा हॉटेल समोरील आणि ऋतुराज अपार्टमेंटच्या मागील बाजूस असलेल्या आमच्या रस्त्यावर या भागातील कांही लोक आणि रस्त्यावरील फेरीवाले मोठ्या प्रमाणात कचरा टाकत असतात. महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून हा कचरा दररोज सकाळी साफ केला जात असला तरी दिवसभर तो रस्त्याशेजारी पडलेला असतो परिणामी दुर्गंधी सह डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हा कचरा भटकी कुत्री व उंदरांना आकर्षित करतो सातत्याने टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे या भागात उंदरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने विविध रोग उद्भवण्याची शक्यता आहे. माझ्या मुलांची स्थिती पाहता सध्या या भागात डेंग्यूची साथ पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तेंव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित योग्य ती कार्यवाही करावी, अशा आशयाचा तपशील संज्योती पानारे यांच्या निवेदनात नमूद आहे.