हिंदवाडीतील गोमटेश विद्यालयासमोरील स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नव्याने तयार करण्यात आलेल्या मुख्य रस्त्यावरील दुभाजकाचे अर्धवट अवस्थेतील काम सध्या मृत्यूचा सापळा बनले आहे.
गोमटेश विद्यालयासमोरील मुख्य दुपदरी रस्ता स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नव्याने बांधण्यात आला आहे. कॉंक्रिटीकरण करण्यात आलेल्या या दुपदरी रस्त्याच्या दुभाजकाचे काम अर्धवट सोडण्यात आले आहे. याठिकाणी रस्त्याकडेचे दुभाजकाला लागून असलेले कांही काँक्रीटचे ब्लॉक बसविण्यात आले नसल्यामुळे धोकादायक खड्डा निर्माण झाला आहे. याखेरीज लगतच अर्धवट बांधकामामुळे त्या ठिकाणच्या दुभाजकाच्या लोखंडी सळ्या उघड्यावर आल्या आहेत.
सदर रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. सध्या पावसाळ्याला सुरुवात होणार आहे, अशा परिस्थितीत जर दुर्दैवाने या ठिकाणचे पथदीप बंद पडले आणि अंधार पसरला तर मोठी दुर्घटना घडण्याचा धोका आहे.
नवागत वाहनचालकांसाठी दुभाजकाचे हे टोकदार लोखंडी सळ्यांचे अर्धवट अवस्थेतील बांधकाम मृत्यूचा सापळा ठरू शकते. तरी स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन गोमटेश विद्यालयासमोर रस्ता व तेथील दुभाजकाचे अर्धवट अवस्थेतील बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.