कोरोनाशी संबंधित रुग्णांचा वाढता आताताईपणा आणि पर्यायाने हॉस्पिटल बद्दलचे जनमत कलुषित होण्याचा प्रकार रोखण्याच्या दृष्टीने रामबाण उपाय म्हणून बेळगावच्या बीम्स हॉस्पिटलने कोरोना प्रादुर्भाव संबंधित जे रुग्ण उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सहकार्य करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे .
बेळगावातील बिम्स हॉस्पिटलला कोरोना बाधित रुग्णावर उपचार करणारे अधिकृत इस्पितळ म्हणून राज्य सरकारने मान्यता दिली आहे. बेळगाव जिल्ह्यातील बीम्स हे इस्पितळ आवश्यक सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज इस्पितळ म्हणून प्रसिद्ध आहे. तथापि गेल्या कांही दिवसांपासून या इस्पितळांमध्ये दाखल करण्यात आलेल्या काॅरन्टाईन रुग्णांच्या बाबतीत तक्रारी वाढल्या आहेत.
यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत. तथापि वस्तुस्थिती तशी नसल्याचे बीम्स प्रशासनाचे स्पष्टीकरण आहे. एखाद्या रोगग्रस्त रुग्णावर उपचार करण्याची एक ठराविक पद्धत असते त्या अनुषंगाने हॉस्पिटलमधील कोरोना संदर्भातील रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र कांही विघ्नसंतोषी रुग्णांमुळे बीम्सची प्रतिमा मलीन होत असल्याचे ध्यानात घेऊन सदर हॉस्पिटलच्या प्रशासनाने आता कडक पाऊल उचलले आहे.
कोरोना संसर्गाचे दुष्परिणाम अत्यंत भयंकर होऊ शकतात हे लक्षात घेऊन बीम्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या कोरोना प्रादुर्भाव संबंधित रुग्णांनी जर हॉस्पिटलमधील वैद्यकीय उपचारास विरोध दर्शविल्यास अथवा त्यासंदर्भात शंका उपस्थित करून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित रुग्णांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय बीम्स प्रशासनाने घेतला आहे.
बीम्सच्या निर्णयानुसार जर एखाद्या रुग्णावर गुन्हा दाखल झाला तर उपचारांती बरे झाल्यानंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.