नागरिक कोणत्या फसवणुकीला बळी पडतील हे काही सांगता येत नाही. समोरून आलेल्या फोन कॉल वरून स्वतःच्या एटीएम क्रमांक तसेच तुम्हाला लॉटरी लागली आहे हे आणि बरेच काही फसवणूक करण्याचे फंडे विकसित झाले आहेत. याची दक्षता नागरिकांनी घेण्याची गरज आहे. मात्र आता आयुर्वेदिक औषध विक्रीच्या नावे ही फसवणूक होऊ लागली आहे. या प्रकरणी खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
शनिवार खुट परिसरात महादेव आर्केट मध्ये असलेल्या जनता आयुर्वेदिक शॉपचा मालक दुर्गाप्पा आणि रेणुका यासह तिघांवर भादवि 420 कलमांतर्गत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. येथील खडेबाजार पोलीस स्थानकात यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. पोलीस स्थानकाचे निरीक्षक धीरज शिंदे पुढील तपास करीत आहेत. मात्र आयुर्वेदिक औषध विक्रीच्या नावावर जेव्हा फसवणूक होते तेव्हा मात्र आरोग्याचा प्रश्नही तितकाच गंभीर होतो.
शनिवार खुट परिसरात रस्त्याशेजारी कंगवे विकणाऱ्या एका महिलेची फसवणूक झाल्याची फिर्याद तिने खडेबाजार पोलीस स्थानकात दाखल केली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या एकाने हाक मारली चालताना का लंगडता अशी विचारणा केली.
यावर आयुर्वेदिक औषधे देण्याचे सांगून त्या दुकानात नेले. त्या महिलेला 5000 हून अधिक रुपये किमतीचे औषधे दिली. मात्र त्या औषधाचा गुण झाला नाही. त्यामुळे त्या महिलेने आपली फसवणूक झाली असल्याची फिर्याद दाखल केली आहे. ही फसवणूक अनेक नागरिकांची होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. त्यामुळे यापुढे आता नागरिकांनी सजगता बाळगावी असे दिसून येत आहे. या फसवणूक प्रकरणी खडेबाजार पोलीस पुढील तपास करीत आहेत.