कोरोनाला रोखण्यात देशात पंतप्रधान जसे नंबर वन आहेत तसे राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री नंबर वन आहेत. जनतेच्या सुरक्षेसाठी ते अहोरात्र झटत असल्यामुळेच अन्य राज्यांच्या तुलनेत कोरोनाचा कहर बऱ्याच प्रमाणात नियंत्रणाखाली आहे, असे मत मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव शंकरगौडा पाटील यांनी व्यक्त केले.
गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत राज्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे योगदान आणि त्यांनी अंमलात आणलेल्या उपाययोजना या संदर्भात आज मंगळवारी सकाळी “बेळगाव लाइव्ह”शी बोलताना शंकरगौडा पाटील यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. भारतीय जनता पक्षातर्फे विविध उच्च पदे भूषविलेल्या आणि सध्या मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव असलेले शंकरगौडा पाटील पुढे म्हणाले की, सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाचा काळात जनतेच्या काळजीपोटी मुख्यमंत्री कित्येक दिवस निवांत झोपले नाहीत. जनतेच्या हितासाठी अहोरात्र झटण्याची त्यांची वृत्ती पाहून मी भारावून गेलो आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असले तरी स्थलांतरितांच्या समस्येमुळे त्यात अद्याप यश आलेले नाही.
कोरोनामुळे परराज्यातील स्थलांतरित कामगार आपापल्या गावी निघून गेले असले तरी फारसे बिघडलेले नाही. यासंदर्भात बिल्डर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. याचप्रसंगी बिल्डर आणि क्रेडाईच्या सदस्यांनी आपापल्या कामगारांना सर्व त्या सुविधा देण्याबरोबरच लेबर कार्ड देऊन काम करण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसेच सरकार त्या कामगारांना सर्व त्या सुविधा देईल, असे आश्वासनही दिले आहे. त्यामुळे राज्यात कामगार टंचाईचा प्रश्न उद्भवणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
अलीकडेच मुंबईहून बेळगाव मार्गे बेंगलोरला जाणाऱ्या मूळच्या कर्नाटकातील सुमारे 200 कामगारांना माघारी पाठवण्यात आले. यासंदर्भात बोलताना शंकरगौडा पाटील यांनी महाराष्ट्रातील विशेष करून मुंबईतील कोरोनाचा उद्रेक लक्षात घेऊन नाईलाजाने त्या कामगारांना माघारी पाठवावे लागल्याचे सांगितले. प्रत्यक्षात प्रारंभी महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणाऱ्या कोणत्याही कामगाराची अडवणूक केली जाऊ नये, अशी सूचना मी स्वतः त्यांच्या सोबत असताना खुद्द मुख्यमंत्र्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकार्यांना दिली होती. परंतु त्यानंतर मंड्या, चिक्कमंगळूर, म्हैसूर, बेळगाव आदी कोरोना नसलेल्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागल्यामुळे महाराष्ट्रातून येणाऱ्यांवर बंदी घालावी लागली. कर्नाटकाची येणार्यांना आम्ही येऊ नका म्हणत नव्हतो. तातडीची वैद्यकीय सेवा अथवा गंभीर आजारी असणाऱ्यांना राज्यात प्रवेश आहे. कर्नाटकात येणे अपरिहार्य आहे अशा लोकांना कधीच आडकाठी केली जाणार नाही, असे पाटील यांनी सांगितले.
राजकीय सचिव या नात्याने मुख्यमंत्र्यांच्या सानिध्यात राहून गेल्या दोन महिन्यात मी खूप काही शिकलो आहे. मुख्यमंत्र्यांच्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहणे सर्व सरकारी खात्यांच्या आढावा बैठकीला हजेरी लावणे. या बैठकीतील महत्त्वांच्या मुद्द्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणे, त्यांना आवश्यक सूचना देणे, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे, सर्वसामान्य नागरिकांसह विविध समाजांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे आदी कामे आपल्याला मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव या नात्याने करावी लागतात, असेही शंकरगौडा पाटील यांनी स्पष्ट केले.
बेळगावच्या विकासाबाबत बोलताना पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा प्रारंभापासूनच बेळगावच्या विकासावर भर देत आहेत. बेळगाव महापालिकेसाठी राज्याच्या इतिहासात कोणीही केली नाही ती 100 कोटी रुपयांच्या विकास निधीची सुरुवात मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी केली आहे. बेळगावसाठी त्यांनी खूप कांही केले आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 450 कोटीचा निधी, सुवर्ण विधानसौध, हिवाळी अधिवेशनं, औद्योगिक क्षेत्राचा विकास, व्हीटीयु व राणी चन्नम्मा विद्यापीठाची स्थापना ही त्याची काही ठळक उदाहरणे आहेत, असे पाटील यांनी सांगितले.
कोरोना विरुद्धच्या लढ्यात डॉक्टर नर्स पोलीस आदी कोरोना योध्यांप्रमाणे पत्रकार मंडळीदेखील आघाडीवर होती याची मुख्यमंत्र्यांना जाणीव आहे. अन्य लोकांप्रमाणे पत्रकारांसाठी देखील शासनाने पॅकेज जाहीर करावे अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी रास्त असून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे शंकरगौडा पाटील यांनी शेवटी सांगितले.
लॉक डाऊन काळात येडीयुराप्पांनी काय केलं ?कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांचे राजकीय सचिव शंकर गौडा पाटील सरकारच्या कोरोना स्ट्रॅटेजी बाबत काय म्हणाले-पहा खालील व्हीडिओ
#shankargowdapatil
#cmpoliticalsecretary
#bsyediyurappaoncorona
#belgaumLivenew
लॉक डाऊन काळात येडीयुराप्पांनी काय केलं ?कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांचे राजकीय सचिव शंकर गौडा पाटील…
Posted by Belgaum Live on Monday, May 25, 2020