विहिरीत पडलेल्या एका कुत्र्याला बेळगाव पशू कल्याण संघटनेच्या (बावा) सदस्यांनी जीवदान दिल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री आनंदनगर येथे घडली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, आनंदनगर येथील एका बांधकामाच्या ठिकाणी असलेला खुल्या विहिरीत कुत्रे पडले आहे अशी माहिती काल गुरुवारी रात्री बावा संघटनेला फोनवरून देण्यात आली.
त्याची दखल घेऊन बावा संघटनेच्या सदस्यांनी एक दोरी घेऊन तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वरूण कुलकर्णी या बावा सदस्याच्या छातीला दोरी बांधून त्याला विहिरीत सोडण्यात आले. तसेच दुसऱ्या एका दोरीला बादली बांधून ती खाली सोडण्यात आली.
विहिरीत उतरलेल्या वरूणने घाबरलेल्या कुत्र्याला महत्प्रयासाने पकडून त्या बादलीत घातले. त्यानंतर या कुत्र्याला सुखरूप विहिरी बाहेर काढण्यात आले. त्याचप्रमाणे संभाव्य धोका लक्षात घेऊन खुली असलेली ती विहीर बंद करून टाकण्यात आली. आनंदनगर येथे गुरुवारी मध्यरात्री पार पडलेल्या या बचाव कार्यात वरूण कुलकर्णीसह अमित चिवटे, आदर्श पवार आदींचा सहभाग होता.