भाजपमध्ये सुरू असलेली अंतर्गत धुसफूस आता वाढली असून यामुळे राज्याच्या राजकारणात बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे बेळगाव जिल्ह्यातील मंत्रिपद मिळाले नसल्याने नाराज असलेले आमदार उमेश कत्ती यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे.
आमदार उमेश कत्ती, मुरुगेश निराणी यांच्यासह भाजप मधील नाराज नेत्यांची बंगलोर येथे बैठक झाली असून या बैठकीला उत्तर कर्नाटकातील विसहून अधिक आमदार उपस्थित होते.आपल्याला मंत्रिपद आणि भाऊ रमेश कत्ती यांना राज्यसभेचे तिकीट देण्याची मागणी उमेश कत्ती यांनी केली आहे.मुरुगेश निराणी यांनी देखील मंत्रिपदाची मागणी केली आहे.कत्ती आणि निराणी हे पक्षातील हेवी वेट नेते आहेत.या दोघांनाही मंत्रीपदापासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे हे दोघेही नाराज आहेत.
डॉ प्रभाकर कोरे यांची राज्यसभेची मुदत 25 जून रोजी संपत आहे.पुन्हा दुसरेंदा राज्यसभेवर जाण्यासाठी कोरे उत्सुक आहेत.कोरे हे केवळ उत्तर कर्नाटकातील नव्हे तर कर्नाटकातील वजनदार आणि प्रभावशाली राजकारणी म्हणून ओळखले जातात.भाजप मधील नाराज गटाने बैठक घेतल्यामुळे आणि उमेश कत्ती यांनी रमेश कत्ती यांच्यासाठी राज्यसभेचे तिकीट मगितल्यामुळे भाजपमध्ये पेच निर्माण झाला आहे.राजकीय घडामोडींना वेग आल्यामुळे डॉ प्रभाकर कोरे हे सकाळी बंगलोरला रवाना झाले आहेत.
भाजप मधील असंतुष्टांची हाय कमांड कशी समजूत काढणार,कत्ती यांच्या पाठीशी असलेले आमदार काय भूमिका घेणार,डॉ प्रभाकर कोरे यांना पुन्हा तिकीट मिळणार काय, येडीयुरप्पा यांना बाजूला करून खासदार प्रल्हाद जोशी यांना भाजप टॉप ब्रास मुख्यमंत्री करणार काय याची उत्तरे पुढील काही दिवसात मिळणार आहेत.