लाॅक डाऊनच्या कालावधीत आंतर जिल्हा प्रवासासाठी बेळगाव पोलीस आयुक्तालयाकडून नागरिकांना विशेष पास दिले जाणार असून त्यासाठी खास वेबसाईट तयार करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी इच्छुक नागरिकांना पोलीस आयुक्तालय येथे मार्गदर्शन करण्यात आले.
बेळगाव जिल्हा ऑरेंज झोनमध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे लॉक डाऊनच्या काळात विद्यार्थी, कामगार, व्यापारी आदी लोकांची गैरसोय दूर करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून आंतर जिल्हा प्रवासासाठी विशेष पास देण्यात येणार असून त्यासाठी खास वेबसाईट तयार करण्यात आली आहे. सदर पास पोलीस उपायुक्त सीमा लाटकर या वितरित करणार आहेत. यासंदर्भात सोमवारी बेळगाव पोलीस आयुक्तालय आवारात आयोजित कार्यक्रमांमध्ये पोलिस उपायुक्त लाटकर यांच्यावतीने गुन्हा शाखेचे मंडल पोलीस निरीक्षक महांतेशराव जिद्दी यांनी नागरिकांना मार्गदर्शन करून वेबसाईट संदर्भात माहिती दिली.
या वेबसाईटद्वारे आंतरजिल्हा प्रवासासाठी उपलब्ध करून दिला जाणारा विशेष पास फक्त एका व्यक्तीला एका दिवसासाठी एका ठिकाणी जाण्यासाठी वैध असणार आहे. त्याचप्रमाणे बेळगाव पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील गावे अथवा जिल्ह्यांसाठी हा पास मर्यादित राहील, असे मंडल पोलीस निरीक्षक महांतेशराव जिद्दी यावेळी सांगितले. याप्रसंगी सदर पाससाठी इच्छुक बहुसंख्य लोक उपस्थित होते. इच्छुकांनी आंतर जिल्हा प्रवासी पास मिळवण्यासाठी https://kspclearpass.idp.mygate.com/otp ही लिंक ओपन करून मोबाईल नंबरसह आवश्यक माहिती भरावयाची आहे.
लाॅक डाऊनमुळे सध्या परगावातील अनेक विद्यार्थी, कामगार, व्यापारी, व्यवसायिक वगैरेंना बेळगावात अडकून पडावे लागले आहे. बेळगाव ऑरेंज झोनमध्ये असल्यामुळे सोमवारपासून अनेक दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस खात्याकडून खास वेबसाइटची निर्मिती करून सदर आंतरजिल्हा प्रवासासाठीच्या पासची व्यवस्था करण्यात आली आहे.