सरकारने विणकर व्यवसाय करणाऱ्या मालकांना पॅकेज जाहीर केले. मात्र मागावर काम करणाऱ्या कामगारांना कोणतेच पॅकेज जाहीर केले नाही. यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे. आम्ही काम केल्यानंतरच साड्यांचे उत्पादन होते. असे असताना आमच्याकडे दुर्लक्ष केले असून तातडीने विणकर कामगारांची नोंद करुन घेवून आम्हालाही पॅकेज द्यावे, अशी मागणी विणकर कामगारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
पर जिल्ह्यातून आम्ही कामानिमित्त बेळगावात आलो आहे. हातमाग मालकांकडे आम्ही अनेक वर्षांपासून काम करत आलो आहोत . मात्र आता लॉकडाऊनमुळे कामही नाही. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
हातमाग आणि यंत्रमाग मालकांना सरकारने पॅकेज जाहीर केले. त्यामध्ये कामागारांना मात्र काहीच देण्यात आले नाही. हा आमच्यावर अन्याय झाला आहे. विणकर कामगारांची नोंद करुन घेवून आम्हाला विशेष पैकेज द्यावे, अशी मागणी केली आहे.
शिरस्तेदार एम. एम. नदाफ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शंकर कामकर, रवी पाटील, विठ्ठल बंगोडी, बलराम संगोळी, सिध्दाप्पा मोदगी, शंकर सातपुते, मंजु कौजलगी यांच्यासह कामगार उपस्थित होते.