येत्या पावसाळ्यात शहरासह विशेष करून बेळगाव उत्तर भागात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आमदार ॲड. अनिल बेनके दक्ष झाले आहेत. यासाठी त्यांनी मनपा आयुक्त आणि अन्य अधिकाऱ्यांसमवेत आज मंगळवारी पाहणी दौरा करून आवश्यक कामांना चालना दिली.
दरवर्षी पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होत असते. बेळगाव उत्तर भागातील शिवाजीनगर, गांधीनगर क्लब रोड आधी परिसरात मागील वर्षी पूर परिस्थितीमुळे मालमत्तेचे नुकसान होण्याबरोबरच नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. यंदा येत्या पावसाळ्यात असा प्रकार घडू नये यासाठी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके गेल्या कांही महिन्यापासून कार्यरत आहेत. लॉक डाऊन असतानाही अलीकडेच त्यांनी लेंडी नाल्याची साफसफाई करून घेतली आहे. बळ्ळारी नाला देखील कांही प्रमाणात स्वच्छ करण्यात आला आहे. आपल्या मतदार संघात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आमदार बेनके आणखीही कांही उपाययोजना करत आहेत.
या अनुषंगाने आमदार अनिल बेनके यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त जगदीश के. एच., कार्यकारी अभियंता हिरेमठ महापालिकेचे अन्य अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 चे अधिकारी यांच्या समवेत पाहणी दौरा केला.
या दौर्यादरम्यान त्यांनी क्लब रोड, शिवाजीनगर, लेंडी नाला, बेळ्ळारी नाला आणि संभाजी गल्ली येथील नाला या ठिकाणी भेट देऊन तेथील पाण्याचा निचरा व्यवस्थित होत आहे की नाही याची पाहणी केली. तसेच आवश्यक त्या सूचना करून प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आदेश दिला.