बुडालेला महसूल वाढवण्यासाठी सरकारने अग्रक्रमाने दारू दुकाने सुरू केली, अन दारू दुकानाच्या बाहेर मद्य प्रेमींची झुंबड उडाली. 42 दिवस रेशन दुकाना बाहेर, किराणा दुकाना बाहेर, भाजी विक्रेत्या कडे उसळणारी गर्दी अचानक यु टर्न घेऊन दारू दुकानाकडे वळली.
एकंदर दारू शिवाय जीवनमान ठप्प झाले होते की काय असे चित्र निर्माण झाले होते. मोठं मोठ्या पिशव्या घेऊन दारूचा साठा नेण्यासाठी लोकं येत होते … सामाजिक संस्था, प्रशासन आणि इतर सामाजिक कार्यकर्ते जीवनावश्यक वस्तू मोफत वाटत होते. त्यावेळी जनता बंद मुळे हैराण झाली की काय?त्यांच्या कडील पैसा संपला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.जनतेच्या दैनावस्थेचे लेख वृत्तपत्रात छापून येत होते.अन्नासाठी तळमळणाऱ्या लोकांचे व्हीडिओ व्हायरल होत होते.
भाजीसाठी लोक पिशव्या घेऊन धावत होते हे सर्व चित्र एका दिवसात पालटले लोकांच्या खिशात पैश्यांचे पूडकेच्या पुडके आले. लोकं दारूच्या दुकानाच्या बाहेर रांगा लावून उभे राहिले. दुकान दारांनी अबकारी खात्याच्या उपस्थितीत ग्राहकांचे हार घालून स्वागत केले .सगळं अलबेल झालं कुठं आहे दैन्य?कुठं आहे कमतरता? कुठं आहे कोरोना? अशी परिस्थिती निर्माण झाली.प्रशासनानी जर दारू दुकाना बाबतीत जी सतर्कता दाखवली, ती शेती माला बाबत दाखवली असती तर शेतकऱ्यांना स्वतःच्या उभ्या पिकांवर नांगर फिरवावे लागले नसते. एकेकाळी रतन खत्रीने टॅक्स भरून मटका चालवण्याची परवानगी मागितली होती तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ती नाकारली होती.
महसूल वाढवण्यासाठी कोणताही मार्ग स्वीकारणं शासनाला शोभत नाही. लोकांच्याकडे धान्य खरेदी करायला पैसे नव्हते त्यांना पैसे दिले गेले, मोफत धान्य दिलं गेलं आता त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसा कसा आला हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यभरात एकाच दिवसांत 45 कोटींच्या दारूची तडाखेबंद विक्री झाली, तर टॅक्स रूपाने भरलेला पैसा लोकांना मोफत धान्य देण्यासाठी वापरला जात आहे.दारू घ्यायला पैसे आहेत, मग धान्य घ्यायला पैसे नाहीत का?हा प्रश्न निरुत्तरीत करणारा आहे.
दारू दुकाना बाहेर उसळणाऱ्या गर्दीने सोशल डिस्टन्स पाळले जात आहेत का देखील लाख मोलाचा प्रश्न आहे. 42 दिवस घरात बंदिस्त असणारे नागरिक त्यांना घरी का बसवले?आणि 42 दिवसा नंतर एका दिवसात कोरोना परत गेला का? हा संशोधनाचा विषय आहे.सरकार गोंधळात सापडले आहे हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.नेमकं काय करावं हेच जनतेला आणि सरकारला कळेनासे झाले आहे.