पोटासाठी माणसाला गावाच्या, राज्याच्या, देशाच्या सीमा ओलांडाव्या लागतात. कधी कधी असे पोटार्थी बाहेर गेलेल्या लोकांना आपल्याच गावात येताना अडचणींचा सामना करावा लागतो. अशीच कथा आहे राघवेंद्र भट आणि कविता भट यांची. .
हे मनस्वी कुटुंब गेली 11 वर्षे पुण्यात वास्तव्यास असून, राघवेंद्र पिंपरी चिंचवड येथील बजाज ऑटो मनुफॅक्चरिंग युनिट मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यांच्या संसाराच्या वेलीवर सात महिन्यापूर्वी कोवळा अंकुर फुटल्याची जाणीव या दाम्पत्याला झाली, आणि त्यांचे जीवन मोहरून गेलं. नव्या नवलाईच्या दिवसांत तरंगत असताना, नव्या पाहुण्याची चाहूल लागलेली असताना त्यांना गावाकडे जायचेही वेध लागले.नवजात बालकाचा जन्म आपल्याच मातीत व्हावा अशी या दाम्पत्याची इच्छा…
आणि मध्येच उदभवल हे कोरोनाचे संकट! कवीताला आठवा महिना लागलेला, नव्या बाळाचा जन्म लवकरचं होणार असलेला. तिचं मन कारवार जिल्ह्यातील कुमट्याजवळील उंदिगोळला धावत असलेलं. राघवेंद्र यांनी पळापळ करून चार दिवसात सेवा सिंधू योजनेतून पुणे पोलिसांकडून आंतर राज्य प्रवास करण्याचा अंबुलन्स पास मिळवला, आणि त्यांचं मन खुलून आलं..आता बाळाचा जन्म आपल्याच घरी होणार आत्या, मामा, आजी यांच्या साक्षीने नवजात बालक पृथ्वीवरचा पहिला सूर्य बघणार..आईच मन मोगऱ्याच्या फुलासारखं फुलून आलं आणि पुणे येथून अंबुलन्स मधून कुमट्या कडे येण्याचा प्रवास सुरु झाला. कोल्हापूर कागल पर्यंत सगळं आलबेल होतं, पण कोगनोळी टोल नाक्यावर त्यांना अडवण्यात आलं .कवितांचं मन कचरलं नाना आशंकांनी भरून गेलं. धीराचा राघवेंद्रही कासावीस झाला 8 महिन्याची गरोदर पत्नीला घेऊन आपल्याच राज्याच्या सीमेवर आलेला राघवेंद्र नजरेत येत असलेल्या कुमुट्याकडे जाऊ शकत नव्हता..त्याच्यातला बाप करपत चालला होता, कविता सुकत चालली होती
या दाम्पत्याची तळमळ माध्यमाच्या प्रतिनिधींनी आपल्या कॅमेऱ्यात पकडली, शब्दात खुलवली आणि घराघरात पोचवली. या दाम्पत्याचा टाहो लोकांच्या काळजावर चरे पाडत होता. थकलेलं दाम्पत्य निराशेने परत फिरलं होतं .खाकीतल्या वर्दीतील एस पी लक्ष्मण निंबरगी यांना आपल्या बहिणीचा टाहो अस्वस्थ करून गेला आणि खाकीतल्या माणसाला माणुसकीचा जिव्हाळा फुटला.. एस पी स्वतः जातीने टोल नाक्यावर गेले अन निराश होऊन परतीच्या वाटेला लागलेल्या भट दाम्पत्याला फोन वरून माणुसकीची हाक दिली आणि त्याचं आपल्या राज्यात स्वागत केलं. राघवेंद्र कवितानी आपल्या मनाच्याअश्रुला बांध मोकळे करून दिले.असा प्रवास झाला कोरोनाच्या संकट समयी एका अवघडलेल्या मातेचा..
आता आपल गाव असेल, आपली माती असेल आपली माणसं असतील आणि एका सुंदर वेळी एक हासरं बाळ जन्माला येईल. माणुसकीचा झरा आईच्या पोटातच अनुभवलेले. आणि एक चांगली माणुसकी जन्म घेईल.. जसं अभिमन्यूने आईच्या पोटातच चक्रव्यूह भेदण्याचे तंत्र आत्मसात केले होते आणि त्यात तो पारंगत झाला होता तसे….