सध्या दहावीच्या परीक्षेबाबत अनिश्चितता असल्याने अभ्यासापासून दूर जात असलेल्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गावोगावी जाऊन मार्गदर्शन करण्याचे आदर्शवत कार्य खानापूर तालुक्यातील एका मुख्याध्यापकांनी हाती घेतले आहे. या मुख्याध्यापकांचे नांव महेश सडेकर असे असून लॉक डाऊनच्या काळातील त्यांच्या या स्तुत्य कार्याची पालकांसह शिक्षणप्रेमींमध्ये प्रशंसा होत आहे.
दुर्गम भागातील विद्यार्थी अभ्यासापासून दूर जाऊ नयेत यासाठी जांबोटी (ता. खानापूर) येथील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी लॉक डाऊन सुरू झाल्यापासून चिखली, कालमनी, कुसमळी, चापोली, कापोली (खुर्द) आदी गावात जाऊन दहावीच्या विद्यार्थी – विद्यार्थिनींना शिकविण्यास सुरुवात केली आहे. जांबोटी परिसरातील अनेक गावे दुर्गम प्रदेशात असून तेथील विद्यार्थ्यांना मोठी पायपीट करून शिक्षणासाठी जांबोटी, कणकुंबी आदी ठिकाणी जावे लागते. यंदा कोरोनाच्या संकटामुळे मार्चमध्ये होणारी दहावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. सध्या ही परीक्षा केंव्हा होणार याबाबत अनिश्चितता असल्यामुळे विद्यार्थी अभ्यासापासून दूर जात आहेत. यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांच्या गावात जाऊन शिकविण्याचा निर्णय मुख्याध्यापक सडेकर यांनी घेतला आहे. त्यानुसार गेल्या अनेक दिवसांपासून ते गावोगावी जाऊन विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत आहेत.
सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन केले जात आहे. त्याचप्रमाणे शिक्षक देखील अभ्यासासंदर्भात सातत्याने विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून मार्गदर्शन करत आहेत. मात्र ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे इंटरनेटची सुविधा नाही. या परिस्थितीत मुख्याध्यापक सडेकर गावागावात जाऊन थेट विद्यार्थ्यांशी संपर्क साधत असल्याने विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेबाबतची भीती कमी झाली आहे. यामुळे पालकवर्गात समाधान व्यक्त होताना दिसत आहे. दरम्यान, शिक्षण खात्याने कोणत्याही परिस्थितीत दहावीची परीक्षा घेतली जाणार हे स्पष्ट केले आहे त्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अभ्यासापासून दूर जाऊ नये, असे आवाहन मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी केले आहे.