शिवाजीनगर येथील महिला व बालकल्याण खात्याच्या कार्यालय आवारात चालणाऱ्या गांजा विक्री, जुगार मद्यपान आदी गैरप्रकारांना त्वरित आळा घालावा. तसेच यासंदर्भात विनाकारण चौकशीसाठी म्हणून ताब्यात घेतलेल्या शिवाजीनगर येथील निरपराधी युवकांची पोलिसांनी तात्काळ सुटका करावी, अशी जोरदार मागणी शिवाजीनगर येथील समस्त नागरिकांनी केली आहे.
यासंदर्भात शिवाजीनगरवासियांनी गुरुवारी महिला व बाल कल्याण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरून जाब विचारला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवाजीनगर येथील महिला व बालकल्याण खात्याचे कार्यालय सायंकाळी बंद झाल्यानंतर कार्यालय आवारात गांजा विक्रीसह जुगार खेळला जातो. त्याचप्रमाणे दारूचा पार्ट्या होत असतात. याठिकाणी गांजा आणि दारू पिणाऱ्या नशेखोरांमुळे शिवाजीनगरवासियांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गांजा व दारू पिणारे युवक यांच्यातील रात्रीच्या वेळी होणारी भांडणे ही नित्याची बाब झाली आहे. ही मंडळी आपापसात तर भांडतातच त्याशिवाय येथील घरांच्या दारावर लाथा मारणे, दगडं मारणे आदी प्रकार करत असतात. काल बुधवारी सायंकाळनंतर याठिकाणी नशेखोरांमध्ये जोरदार भांडण झाले. याप्रकरणी मार्केट पोलिसांनी रात्री शिवाजीनगर येथील काही निरपराध युवकांना चौकशी करून लगेच सोडतो असे सांगून ताब्यात घेतले असून अद्यापही पोलीस ठाण्यात डांबून ठेवले आहे. तेंव्हा शिवाजीनगर येथील पंच कमिटीला बोलावून घेऊन शहानिशा करून त्या युवकांची तात्काळ सुटका करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
शिवाजीनगर येथील महिला व बालकल्याण खात्याचे कार्यालय सायंकाळी बंद झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत कार्यालय आवारात गांजा विक्रीसह जुगार खेळला जातो. त्याचप्रमाणे दारूचा पार्ट्या केल्या जातात. हे नशेखोर आणि मद्यपी युवक शिवाजीनगरातील स्त्री-पुरुषांना अर्वाच्च्य शिवीगाळ करतात. झाडाची फळे मारतात. जुगार तसेच दारू व गांजा पिण्यावरून त्यांच्या दररोज जोरदार भांडणे होत असतात. या भांडणामुळे एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता आहे. तेंव्हा या ठिकाणच्या गैरप्रकारांना त्वरित आळा घालावा अन्यथा सदर कार्यालय अन्यत्र स्थलांतरित करावे. त्याचप्रमाणे काल पोलीसांनी ज्या निरपराध युवकांना ताब्यात घेतले आहे त्यांची तात्काळ सुटका केली जावी, अशी मागणी शिवाजीनगर येथील एका नागरिकांनी केली.
आपल्या मुलांचा मारामारीशी कांहीही संबंध नव्हता. काल रात्री 10 च्या सुमारास आम्ही सर्वजण घरात जेवायला बसलो होतो. त्यावेळी ताटावर बसलेल्या आपल्या संभाजी व श्री या दोन मुलांना पोलीस घेऊन गेले आहेत. जरा चौकशी करतो आणि लगेच सोडून देतो असे सांगून पोलिसांनी आपल्या मुलांना नेले असून अद्यापि त्यांची सुटका करण्यात आली नसल्याची तक्रार शालन घाटगे या शिवाजीनगर येथील महिलेने प्रसारमाध्यमांसमोर केली.
अन्य एका महिलेने गांजा पिणाऱ्यांकडून आणि मद्यपींकडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली. शिवाजीनगर हे नांव मोठे आहे. या ठिकाणी असलेले हे सरकारी कार्यालय देखील नामांकित असून अशा या कार्यालयाच्या आवारात गांजा विक्री, जुगार व मद्यपानासारखे गैरप्रकार घडतात ही अत्यंत लांच्छनास्पद बाब असल्याचे सांगितले. या गैरप्रकारांना त्वरित आळा घातला जावा. यासाठी याठिकाणी सुरक्षारक्षक अथवा पोलीस बंदोबस्त ठेवावा आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या निर्दोष युवकांची सुटका करावी, अशी मागणी संबंधित महिलेने केली. याप्रसंगी महिला व बालकल्याण खात्याच्या कार्यालय आवारात शिवाजीनगरवासीय विशेष करून महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.