प्रशासनाकडे माझ्या मूळगावी परत जाण्यास परवानगी मागण्याचा परिणाम हा झाला आहे की, खिशात फुटकी कवडी नाही, निवारा नाही आणि माझ्या चार महिन्याच्या मुलाला आवश्यक आहार मिळत नाही, अशा स्थितीत मी येऊन पडलो आहे”. ही व्यथा आहे उत्तर प्रदेशातील मोहम्मद अन्सारी या स्थलांतरिताची. जो सध्या आपल्या पत्नी आणि तीन मुले अशा कुटुंबासह गेल्या 5 दिवसांपासून सीपीएड मैदानाशेजारील एका झाडाखाली रहात आहे.
अन्सारी हा कामगार असून येरगट्टी (ता. बेळगाव) येथील एका बांधकामाच्या ठिकाणी तो मजुरी करत होता. परंतु त्याचा कंत्राटदार मजुरी न देता अचानक बरेच दिवस काय गायब झाल्यामुळे अन्सारीने मूळगावी परतण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कनवटीला शिल्लक असलेले पैसे घेऊन तो उत्तर प्रदेशात परत जाण्याची परवानगी घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे गेला होता. तेंव्हा त्याला उत्तर प्रदेशला परत जाण्यासाठी प्रत्येकी 1,100 रुपये प्रवासखर्च भरण्यास सांगण्यात आले. अन्सारीने आपला खिसा रिकामा करुन हा प्रवासखर्च देखील भरला. परंतु आता गेल्या पांच दिवसांपासून अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळालेली नसल्यामुळे कफल्लक अवस्थेत मोहम्मद अन्सारी आपल्या कुटुंबासमवेत सीपीएड मैदानाशेजारील झाडाखाली दिवस कंठत आहे.
येरगट्टी येथून बेळगावला येताना आपण लवकरच आपल्या गावी परत सुरक्षित पोहोचू अशी आशा वाटत होती. परंतु आता परिस्थिती कठीण झाली आहे. येरगट्टी येथील घर सोडून आल्यामुळे ते पुन्हा मिळणार नाही. परिणामी सध्या आम्ही बेघर झालो आहोत, असे अन्सारी याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले संबंधित अधिकाऱ्यांकडून मला आणि माझ्या कुटुंबासाठी अन्नपाण्याची व्यवस्था केली जात आहे. परंतु ते देत असलेला आहार माझ्या चार महिन्याच्या मुलासाठी योग्य नाही. त्याला तो पचेनासा झाला आहे. आम्ही सर्वांनी गेल्या कांही दिवसांपासून आंघोळ देखील केलेली नाही, असेही अन्सारी याने सांगितले.
हरीश आर्य या आणखी एका स्थलांतरिताच्या बाबतीतही अन्सारी सारखाच प्रकार घडला आहे. आर्य आपल्या कुटुंबासह सहा दिवसापासून बेळगावात अडकून पडला आहे आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी त्यानेही कुटुंबातील व्यक्तींसाठी प्रत्येकी 1,100 रुपये प्रमाणे पैसे भरले आहेत. पैसे भरताना आमच्याकडे कोणतीही कागदपत्रे मागण्यात आली नाहीत. परंतु आता जेंव्हा आम्हाला मदत करणार नसाल तर आमचे पैसे परत करा अशी मागणी केली असता, पैसे परत पाहिजे असतील तर फॉर्म भरा, आधार कार्ड दाखवा असे सांगितले जात आहे, हा कुठला न्याय? असा सवाल हरीश आर्य यांनी केला आहे.
गुलशन कुमार या उत्तर प्रदेशच्या स्थलांतरितांचे वडील दोन महिन्यापूर्वी वारले. त्यांच्या अंत्यविधीसाठीही त्याला जाता आले नाही. त्याची आई आणि दोन बहिणी गावी परत जाण्यासाठी बेचैन झाले आहेत. गावी जाण्याच्या परवानगीबद्दल विचारणा केल्यास अधिकारी अरेरावीचे उद्धट वर्तन करतात असा आरोप गुलशन कुमार याने केला आहे. त्याचप्रमाणे सीपीएड मैदानावरील स्थलांतरितांना हाताळण्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना कन्नड शिवाय दुसरी भाषा समजत नाही आम्हाला कन्नड येत नाही. यामुळे व्यवस्थित संवाद साधला जात नाही ही मोठी समस्या असल्याचे गुलशन कुमार याने प्रसारमाध्यमांना सांगितले. तेंव्हा जिल्हा प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन सीपीएड मैदान परिसरात मुक्कामास असलेल्या स्थलांतरितांची लवकरात लवकर त्यांच्या मूळगावी जाण्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.