लोकांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन कोरोना बाधितांच्या ओळखीसह यापुढे त्यांचा पत्ता देखील गुप्त ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
कोरोनाबाधित सापडला की संबंधित भागात भीतीचे वातावरण पसरत आहे. त्याचप्रमाणे लोकांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. या गोष्टी ध्यानात घेऊन उपरोक्त निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने यापूर्वीच कोरोनाबाधितांचे नांव, छायाचित्र जाहीर करणे कायद्याने गुन्हा ठरवले आहे. कोरोनाग्रस्तांना वेगळी वागणूक मिळण्याची शक्यता असल्यामुळे ही खबरदारी घेण्यात आली आहे.
निपाणीजवळ अजमेरहुन आलेल्या आणि काॅरन्टाईन करण्यात आलेल्या 30 कोरोनाबाधितांपैकी 22 जण बेळगाव जिल्ह्यातील विविध चार तालुक्यातील आहेत. परंतु ते नेमक्या कोणत्या तालुक्यातील आहेत ही माहिती देण्यास आरोग्य विभागाने नकार दिला आहे. कारण संबंधित कोरोनाबाधित स्थानिकांच्या संपर्कात आलेले नसले तरी ते नेमके कोणत्या भागातील आहेत हे लोकांना समजले तर तेथील मानसिकता बदलते. त्यामुळे यापुढे कोरोनाग्रस्तांचा पत्ता देखील गुप्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.