त्यांनी कल्पनाही केली नव्हती एक दिवस असा येईल की आपल्याला पाण्यात बुडविलेले बिस्कीट खाऊन आपली भूक भागवावी लागेल. परंतु गेल्या कांही दिवसांपासून भुकेसाठी त्यांना हेच करावे लागत आहे. ही व्यथा आहे कॅम्प येथील सुमारे 20 गरीब कुटुंबांची. जीवनावश्यक साहित्य संपल्यामुळे ज्यांच्यावर उपासमारीचे खडतर जीवन जगण्याची वेळ आली आहे.
बेळगाव बेळगाव शहरातील कंटेनमेंट झोन पैकी एक असलेल्या कॅम्प येथील सुमारे 20 कुटुंबातील सदस्य घरात अन्न नसल्यामुळे गेल्या कांही दिवसांपासून बिस्किटे पाण्यात बुडून खात आहेत. या कुटुंबांना मदतीची गरज आहे. तथापि त्यासाठी सरकारी अधिकारी, बिगर सरकारी संघटना अथवा सेवाभावी संस्थांकडे हात पसरण्याची त्यांची इच्छा नाही. अद्यापपर्यंत या कुटुंबांना गरिबांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. याला कारण वृत्तपत्रे आणि अन्य प्रसार माध्यमांमध्ये आपल्याला “भिकारी” म्हणून प्रसिद्धी मिळू नये, अशी या वीसही कुटुंबातील सदस्यांची इच्छा आहे.
या कुटुंबांपैकी एका कुटुंबातील शेखर (नांव बदललेले) या व्यक्तीने सांगितले की, त्याच्या कुटुंबात 70 वर्षीय विधवा आई, पत्नी व दोन मुले असे सदस्य आहेत. हे सर्वजण गेल्या तीन दिवसापासून बिस्किटे खाऊन जगत आहेत. अद्यापपर्यंत कोणाकडूनही मदत न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. बिस्किटे सुकी खाणे अवघड असल्यामुळे आम्ही ती पाण्यात बुडून खात आहोत, असे शेखर यांनी सांगितले. कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि बोर्डाच्या सदस्यांकडून गरीब गरजूंना जीवनावश्यक साहित्य वाटण्यात येत आहे. मात्र अद्याप ते आमच्यापर्यंत आलेले नाहीत. प्रारंभी आम्हाला दुधाची पाकिटे, चहा पावडर, तांदूळ, खाद्यतेल, लाल तिखट आणि साखर मिळाली होती. परंतु ज्यांनी या वस्तू आम्हाला दिल्या त्याने त्याची छायाचित्रे काढून वृत्तपत्रात प्रसिद्ध केली. त्यामुळे आम्हाला आपण भिकारी आहोत असे वाटले, परंतु आम्ही भिकारी नव्हे तर रोजंदारी कामगार आहोत, असेही शेखर याने स्वाभिमानाने सांगितले. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी सुप्रसिद्ध डॉक्टर दीक्षित आमदार अनिल बेनके आदी मान्यवरांनी गरिबांसाठी सहाय्य निधी दिला आहे. परंतु या निधीचा वापर संबंधित मंडळी फक्त आपल्या ओळखीच्या गरिबांसाठी करत आहेत. गरीब लाभार्थींची निवड करण्यासाठी योग्यप्रकारे सर्वेक्षण झाले नसल्याचा आरोपही शेखरने केला आहे.
दरम्यान, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान सदस्य साजिद शेख यांनी उपासमारीला तोंड देत असलेल्या कॅम्प येथील उपरोक्त गरीब कुटुंबांची दखल घेतली आहे. तसेच कोणताही गाजावाजा न करता प्रसिद्धीपासून दूर राहून त्यांना कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासनही दिले आहे.