कोरोना प्रादुर्भाव व लॉक डाऊनमुळे गेल्या दोन महिन्यापासून व्यवसाय बंद असल्यामुळे यापूर्वीच फुल विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता व्यवसाय सुरू झाला असला तरी तो नुकसानीत चालला असल्याने राज्य शासनाने फुल विक्रेत्यांकडेही लक्ष देऊन मदत करावी, अशी जोरदार मागणी शहरातील फुलं विक्रेत्यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव शंकरगौडा पाटील यांची मंगळवारी भेट घेतली.
शहरातील फुल विक्रेत्यांनी मंगळवारी सकाळी मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव शंकरगौडा पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. गेल्या दोन महिन्यापासून व्यवसाय बंद असल्यामुळे तसेच कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे विवाह समारंभावर मर्यादा, मंदिरे बंद, मोठ्या समारंभावर बंदी यामुळे फुल विक्रेत्यांचा व्यवसाय गेल्या आठ दिवसापासून तोट्यात चालला आहे. दररोज 10 ते 15 हजार रुपयापर्यंत होणारा व्यवसाय आता 2 – 3 हजारावर आल्याने फूलं विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यासाठी राज्य सरकारने फूलं विक्रेत्यांकडेही लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
बेळगाव शहरात फूलं विक्रेत्यांचे सुमारे 50 स्टॉल्स असून सुमारे 500 किरकोळ फुल विक्रेते आहेत. किरकोळ फुल विक्रेत्यांकडे हार व सुटी फुले मिळतात, तर मोठ्या स्टॉल धारकांकडे हार, बुके, गुलाबासारखी खास फुले आदी मिळतात. शहरात रामदेव हॉटेल, रामदेव गल्ली, कॉलेज रोड, आरपीडी कॉर्नर, टिळकवाडी आदी परिसरात हे फुल विक्रेते आहेत. लॉक डाऊनमुळे गेल्या दोन महिन्यापासून फूल विक्रीचा व्यवसाय बंद होता. आता गेल्या आठ दिवसापासून परवानगी मिळाली असली तरी फुलं खरेदीसाठी ग्राहकच नसल्यामुळे फुल विक्रेते अडचणीत आले आहेत. प्रत्येक फूल व्यापाऱ्याकडे 3 ते 4 कामगार असतात. त्यांच्याही पगाराची समस्या निर्माण झाली आहे.
बुके व हारासाठी लागणारी फुले यापूर्वी मंगळूर, कोल्हापूर, मिरज, हुबळी आदी ठिकाणाहून येत होती. मात्र लाॅक डाऊनमुळे सध्या फक्त हुबळी येथूनच फुलं येत आहेत. लग्नसराईच्या हंगामात व्यवसाय बंद झाल्याने फूल विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. फुल विक्रेत्यांवर शेतकरी आणि बुरुड व्यवसायीक अवलंबून असतात. मात्र सध्या फुल विक्रेत्यांचा व्यवसाय अडचणीत आल्यामुळे शेतकरी व बुरुड यांच्या समस्येत भर पडली आहे. तेंव्हा राज्य शासनाने याकडेच तात्काळ लक्ष देऊन फुल विक्रेत्यांना मदत करावी, अशी शहरातील समस्त फुलं विक्रेत्यांची मागणी आहे.