ट्रॅक्टरच्या आवाजाने बिथरून अनावधानाने विहिरीत पडलेल्या एका म्हशीला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढून जीवदान देण्यात आल्याची घटना शहापूर सराफ गल्ली येथे बुधवारी घडली.
याबाबतची माहिती अशी की शहापूर सराफ गल्ली येथील शेतकरी नारायण बुधाप्पा लाड यांनी बुधवारी आपली म्हैस घराशेजारील मोकळ्या जागेत बांधली होती. त्यानंतर या मोकळ्या जागेत एक ट्रॅक्टर आला त्या ट्रॅक्टरच्या आवाजाने बिथरून सैरावैरा झालेली ती म्हैस खुल्या जागेतील जमिनीलगत असलेल्या विहिरीत पडली. सुदैवाने मागील पायाच्या बाजूने पडल्यामुळे म्हशीचे तोंड वर राहिल्याने तिला जीवदान मिळाले. विहिरीत पडलेल्या म्हशीला बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे अधिकारी टक्केकर आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
म्हैस खोल विहिरीत पडली असल्यामुळे पाहणी अंती क्रेनच्या सहाय्याने तिला बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार क्रेन मागून विहिरीत पडलेल्या म्हशीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. यासाठी सतपाल चौगुले हे स्वतः विहिरीत उतरले होते त्यांनी बेल्टच्या सहाय्याने म्हशीला क्रेनला बांधले. विहीरीत पडल्याने किरकोळ जखमी झालेल्या म्हशीवर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संग्रोळी व बेळगुंदकर यांनी उपचार केले. याप्रसंगी म्हशीचे मालक नारायण लाड यांच्यासह सराफ गल्ली मराठा पंच कमिटीचे सर्व सदस्य, माजी नगरसेवक राजू बिर्जे, पंच कमिटीचे अध्यक्ष सुनील इंचल आदी उपस्थित होते.