शहरातील रविवार पेठ होलसेल मार्केटमधील एका कॉस्मेटिक्सच्या दुकानात चोरी करणाऱ्या एका चोरट्याला आसपासच्या नागरिकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना बुधवारी पहाटे घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, रविवार पेठ होलसेल मार्केटमध्ये शास्त्रीनगर येथील नगाराम देवासी यांच्या मालकीचे मारुती मार्केटिंग हे कॉस्मेटिक्सचे दुकान आहे. लॉक डाऊनमुळे सध्या हे दुकान बंद आहे. सदर दुकानांमध्ये आज भल्या पहाटेच्या सुमारास एक चोरटा चोरी करण्याच्या उद्देशाने घुसला होता. हा प्रकार बुधवारी पहाटे 5 – 5.15 च्या सुमारास आसपास वावरणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच चोरी करून दुकानाबाहेर पडणाऱ्या त्या चोरट्यास त्यांनी रंगेहात पकडले.

याबाबतची माहिती मिळताच मार्केट पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन त्या चोरट्याला ताब्यात घेतले. सदर चोरट्या सोबत आलेले त्याचे साथीदार दुकानाबाहेर कांही अंतरावर थांबले होते. त्यामध्ये महिलांचाही समावेश होता असे समजते.
संबंधित चोरट्याला पकडण्यात आले असले तरी तत्पूर्वी त्याने दुकानातील माल आपल्या साथीदारांकरवी लंपास केला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लॉक डाऊनमुळे मारुती मार्केटिंग दुकान बंद असल्याने नेमक्या कोणत्या वस्तूंची आणि किती चोरी झाली हे समजू शकले नाही. त्याचप्रमाणे दुकान उघडून पाहणी केल्याखेरीज किती रुपयांची चोरी झाली आहे हे सांगता येणार नसल्याचे नगाराम देवासी यांनी “बेळगाव लाईव्ह”ला सांगितले. याप्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून गजाआड झालेल्या चोरट्याची चौकशी सुरू आहे.
Piz