मायाक्का चिंचली (ता. रायबाग) येथील धर्मशाळेत कोरोना संशय रुग्णांची काॅरन्टाईनची सोय करण्यास नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. तसेच संबंधित काॅरन्टाईन रुग्णांची ज्या ठिकाणी कोरोना संशयित आढळले आहेत त्याठिकाणी व्यवस्था केली जावी, अशी मागणीही केली आहे.
रायबाग तालुक्यातील मायाक्का चिंचली हे एक पवित्र धार्मिक स्थळ आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी कोरोना संशयित रुग्ण आढळून येत असताना मायाक्का चिंचली येथे अद्यापपर्यंत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. याला कारण म्हणजे मायाक्का चिंचली गावामध्ये वेळच्या वेळी हायड्रोक्लोरोक्वीन या जंतुनाशकाची फवारणी केली जाते. त्याचप्रमाणे नागरिकांकडून मास्कचा वापर आणि सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन केले जाते. हे गाव पूर्णपणे कोरोना मुक्त ग्रीन झोनमध्ये असताना आता येथील धर्म शाळेमध्ये काॅरन्टाईन रुग्णांची सोय करण्याचा घाट रचला जात आहे.
तहसीलदार चंद्रकांत बजंत्री हे कांही अधिकार्यांसमवेत काल शुक्रवारी मायाक्का चिंचली येथील धर्मशाळेत काॅरन्टाईन रुग्णांची सोय करण्यासाठी गेले होते. तथापि धास्तावलेल्या नागरिकाने तेथे काॅरन्टाईन रुग्णांना ठेवण्यास विरोध केल्यामुळे अधिकाऱ्यांना माघारी परतावे लागले. मायाक्का चिंचली गावातील धर्मशाळा ही श्री मायाक्का देवी मंदिरानजीक भरवस्तीत आहे. त्यामुळे या ठिकाणी काॅरन्टाईन रुग्णांना ठेवल्यास कोरोना प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या हे गाव कोरोना मुक्त ग्रीन झोनमध्ये आहे. त्यामुळे याठिकाणी कोरोना संशयितांना आणून ठेवणे म्हणजे या गावाला रेड झोनमध्ये टाकण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे येथील नागरिकांच्या जीविताशी आणि धार्मिक भावनांशी खेळण्याचा हा प्रकार आहे. तेंव्हा मायाक्का चिंचणी गावात कोरोना संशयित काॅरन्टाईन रुग्णांची सोय केली जाऊ नये. त्याऐवजी संबंधित रुग्णांची कोरोना संशयित आढळलेल्या गावांमध्ये सोय केली जावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.