Sunday, January 12, 2025

/

सकाळी 10 ते 2 पर्यंत सुरू असणार रविवारपेठ बाजारपेठ-झाली महत्वाची बैठक

 belgaum

लाॅक डाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरातील रिटेल व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रविवार पेठेतील होलसेल व्यापाऱ्यांनी दररोज सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आपाआपली दुकाने सुरू ठेवून व्यापार करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

खासदार सुरेश अंगडी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या रविवार पेठेतील होलसेल व्यापाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला याप्रसंगी आमदार ॲड. अनिल बेनके, महापालिका आयुक्त जगदीश के. एच., एसीपी एन व्ही बरमनी आदी उपस्थित होते. सदर बैठकीत उपस्थित व्यापाऱ्यांच्या सूचना आणि समस्या ऐकून घेऊन रिटेल व्यापारी आणि नागरिकांच्या सोयीसाठी दररोज सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत रविवार पेठेतील व्यापार सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दररोज पहाटे 5 ते सकाळी 9.30 वाजेपर्यंत रविवार पेठेत माल घेऊन येणाऱ्या सर्व गाड्या अनलोड केल्या जाव्यात त्यानंतर 9.30 ते सकाळी 10 वाजेपर्यंत रिकामी झालेल्या गाड्या त्वरित रविवार पेठेतून बाहेर पडावयास हव्या असेही बैठकीत ठरविण्यात आले.

याप्रसंगी खासदार सुरेश अंगडी यांनी उपस्थित व्यापाऱ्यांच्या समस्या आणि सूचना जाणून घेऊन निश्चित केलेल्या वेळेचे काटेकोर पालन करून व्यापाऱ्यांनी प्रशासन आणि पोलिस खात्याला सहकार्य करावे असे आवाहन केले. आमदार अॅड. अनिल बेनके यांनी यावेळी बोलताना लॉक डाऊन असतानाही रविवार पेठेत त्याचे उल्लंघन करून गर्दी होत आहे. तसेच जादा दराने अन्नधान्य व अन्य जीवनावश्यक वस्तूंची विक्री केली जात आहे असे आरोप केले जात असल्यामुळे ही बैठक बोलाविण्यात आल्याचे सांगितले तसेच रविवार पेठेतील व्यापार्‍यांनी सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन समाजसेवा म्हणून उलट कमी दराने आपल्याकडील मालाची विक्री करावी, असे आवाहनही केले.

Meeting ravivar peth
Meeting ravivar peth

एसीपी एन. व्ही. बरमनी यांनी उपस्थित व्यापाऱ्यांना निश्चित केलेल्या वेळेप्रमाणे गाड्यांचे अनलोडिंग, गाड्या रिकामी झाल्यानंतर वेळेत रविवार पेठे बाहेर काढणे याबाबत मार्गदर्शन केले माल घेऊन आलेल्या गाड्या रिकामी झाल्यानंतर तेथेच थांबून न राहता तात्काळ रविवार पेठेतून बाहेर पडतील याची काळजी व्यापाऱ्यांनी घ्यावी. बाजारपेठेत गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी यासाठी आवश्यक तितक्याच हमालांना कामावर बोलवावे. रिटेल व्यापाऱ्यांना वेळेच्या निर्बंधाची कल्पना देऊन त्याप्रमाणे सुरळीत व्यापार करावा. दिलेल्या वेळेत जर मालवाहतूक करणाऱ्या गाड्या रविवार पेठेत ये – जा करणार असतील तर त्यांना पोलिसांकडून अडविले जाणार नाही, असे एसीपी बरमनी यांनी स्पष्ट केले. तसेच उपस्थित व्यापाऱ्यांना आवश्यक अन्य सूचना देखील केल्या.

बैठकीस रविवार पेठेतील सर्व व्यापारी उपस्थित होते. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार ॲड. अनिल बेनके यांनी रविवार पेठतील व्यापाराबद्दल घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. व्यापारी बंधूंनी ठरवून दिलेल्या वेळेचे काटेकोर पालन करावे. त्याचप्रमाणे सध्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नये. व्यापार करताना वाटल्यास 2 रुपये कमी घ्या मात्र 1 रुपये जादा आकारू नका. एक समाजसेवा म्हणून व्यापार करा, असे आवाहनही आमदार बेनके यांनी केले.

 belgaum

3 COMMENTS

  1. यह नियम रविवार पेठ के सभी दुकानों पर लागू है क्या??
    रविवार पेठ में सिर्फ किराणी दुकान नहीं हैं, यहाँ पर पेंट, इलेक्ट्रिकल्स, हार्डवेयर, कपड़े और जूते आदि सभी तरह की दुकानें हैं,
    क्या वो सभी खुली रहेगी या सिर्फ किराणी की, इसकी सही से सूचना दें,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.