कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे निर्बंधित क्षेत्र असलेल्या येळ्ळूर (ता. बेळगाव) गावातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी आठवड्यातील तीन दिवस फक्त 1 तासाची सवलत देण्यात आली आहे.
लॉक डाऊन बरोबरच आता कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे येळ्ळूर (ता. बेळगाव) गावाला “कंटेनमेंट झोन” अर्थात निर्बंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यामुळे गावात संचारबंदी लागू करण्याबरोबरच गाव पूर्णपणे सील डाऊन करण्यात आले आहे. ॲम्बुलन्स आणि पोलीस वाहने वगळता या ठिकाणी कोणालाही आत अथवा बाहेर जाण्यास बंदी आहे. या काटेकोर निर्बंधांमुळे येळूरवासियांची सध्या मोठी गैरसोय होत आहे.
यासाठी वामन रवळू पाटील यांच्या नेतृत्वाखालील येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या कोरोना संरक्षण कमिटीच्या सदस्यांनी नुकतीच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन आठवड्यातील कांही मोजक्या दिवसात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना वेळ द्यावा, अशी मागणी केली होती. याप्रसंगी राजू मारुती पावले, शिवाजी हनुमंत पाटील, राजू पांडुरंग उघाडे आणि तानाजी भरमाना हलगेकर हे कोरोना संरक्षण कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
कोरोना संरक्षण कमिटीची मागणी संबंधित अधिकाऱ्यांनी मान्य केली असून आता सोमवार, बुधवार व शुक्रवार या आठवड्यातील तीन दिवसांमध्ये सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत एक तास जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना मुभा देण्यात आली आहे. या कालावधीत गावातील किराणा दुकाने, दूध डेअरी, गिरणी आदी खुले राहणार आहेत. तेंव्हा येळ्ळूरवासियांनी याची नोंद घेऊन कायद्याचे आणि कोरोना संदर्भातील नियमांचे उल्लंघन न करता दिलेल्या सवलतीचा योग्य प्रकारे लाभ घ्यावा, असे आवाहन येळ्ळूर ग्रामपंचायतीने केले आहे.