लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरातील गोरगरीब गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू, अल्पोपहार अथवा भोजनाचे मोफत वाटप करू इच्छिणाऱ्यांनी आपली जी काही मदत असेल ती महापालिकेच्या माध्यमातून करावी असा फतवा काढण्यात आला आहे. तथापि यासाठी जो संपर्क क्रमांक देण्यात आला आहे तो एक तर कायम व्यस्त असतो किंवा त्यावर साहेब कामात आहेत, असे सांगितले जात असल्यामुळे या नव्या फतव्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त होत आहे. तसेच गोरगरिबांना मदत करू इच्छिणाऱ्यांसाठी महापालिकेने 7 – 8 टोल फ्री नंबर द्यावेत अशी जोरदार मागणी होत आहे.
कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर हातावर पोट असलेल्या गोरगरीब लोकांचे पोटापाण्याचे हाल होऊ नयेत यासाठी शहरातील विविध सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या सर्वांकडून शहर आणि परिसरातील झोपडपट्टी तसेच अन्य ठिकाणी राहणाऱ्या गोरगरीब गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंसह अल्पोपहार आणि भोजनाचे मोफत वाटप केले जात आहे. तथापि आता बेळगाव महापालिकेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जावा असा फतवा काढण्यात आला आहे. या नव्या फतव्यानुसार सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी अथवा सेवाभावी नागरिकांनी स्वतः जाऊन गोरगरिबांना मदत करायची नाही. त्याऐवजी त्यांना गोरगरिबांना ज्या काही जीवनावश्यक वस्तू, साहित्य, अल्पोपहार अथवा भोजन द्यावयाचे असे ते त्यांनी महापालिकेकडे आणून द्यावयाचे आहे. आपण दिलेले जीवनावश्यक साहित्य, वस्तू, अल्पोपहार अथवा भोजन कोणत्या भागातील लोकांना द्यावयाचे आहे, याची माहिती इच्छुकांनी महापालिकेला द्यावी. त्यानंतर संबंधित संघ संस्था अथवा व्यक्तीच्या इच्छेप्रमाणे महापालिकेकडून त्या-त्या भागातील लोकांना जीवनावश्यक वस्तू अथवा अल्पोपहार भोजनाचे वाटप केले जाणार आहे.
महापालिकेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमासंदर्भात संपर्कासाठी पालिकेच्या एका जबाबदार अधिकाऱ्याचा मोबाईल नंबर देण्यात आला आहे. बेळगावातील एका सेवाभावी संघटनेला आज बुधवारी कणबर्गी भागात तांदूळ वाटप करावयाचे होते. यासाठी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपाच्या संपर्क क्रमांकावर फोन केला असता तो वारंवार बिझी अर्थात व्यस्त लागत होता. त्यानंतर फोन उचलणाऱ्या महापालिकेतील कर्मचाऱ्याने साहेब कामात आहेत नंतर फोन करा असे उत्तर दिले. त्यामुळे तांदूळ वाटप कसे करायचे असा प्रश्न संबंधित संघटनेला पडला होता. हाच प्रकार इतरांच्या बाबतीत होऊ शकतो. यासाठी महापालिकेने अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची वैयक्तिक दूरध्वनी क्रमांक न देता 7 – 8 टोल फ्री दूरध्वनी क्रमांक द्यावेत, अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान महापालिकेने हा नवा फतवा काढला असला तरी सेवाभावी संघसंस्था, संघटना व दानशूर नागरिकांकडून ज्या गोरगरीब गरजू जनतेसाठी जी मदत महापालिकेकडे सुपूर्द केली जाणार आहे ती संबंधित लाभार्थींपर्यंत नक्की पोहोचणार का? असा सवाल सध्या नागरिकांकडून केला जात आहे.