शेत जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणाचे पर्यवसान एका युवकाने संतापाच्या भरात 55 वर्षे वयाच्या एका इसमाचा प्राणघातक हत्याराने घाव घालून निघृण खून केल्याची घटना खानापूर तालुक्यातील माडीगुंजी येथे आज रविवारी सकाळी 9.30 सुमारास घडली.
मष्णू महादेव झेंडे (वय 55, रा. माडीगुंजी ता. खानापूर) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. तो रेल्वे खात्यामध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, माडीगुंजी गावानजीक शेतामध्ये रविवारी सकाळी शेत जमिनीवरून मष्णू झेंडे आणि मारुती महादेव नावगेकर (वय 22) यांच्यात कडाक्याचे भांडण झाले.
सदर भांडण इतके विकोपाला गेले की संतप्त झालेल्या मारुती नावगेकर याने शेतात पडलेले एक प्राणघातक हत्यार घेऊन मष्णू याच्या डोक्यात घाव घातला. परिणामी रक्ताच्या चिळकांड्या उडून वर्मी घाव बसलेला मष्णू झेंडे रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळून जागीच गतप्राण झाला. सदर प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीस पोलिसांना घटनेची माहिती दिली.
खानापूर पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मष्णू महादेव झेंडे याचा मृतदेह शवचिकित्सेसाठी खानापूर सरकारी रुग्णालयात हलवला. पोलिसांनी आरोपी मारुती नावगेकर याला ताब्यात घेतले आहे. मयत मष्णू झेंडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे. याप्रकरणी खानापूर पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.