ख्रिश्चन बांधवांनी रविवारी वर्षातील पाम संडे या अत्यंत पवित्र अशा आठवड्यात प्रवेश केला आहे. तथापि यंदा परिस्थिती वेगळी असून लाॅक डाऊन असल्यामुळे हा पवित्र आठवडा दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाही. यासाठी ख्रिश्चन बांधवांनी आपापल्या घरातूनच पाम संडे मास साजरा करावा, असे आवाहन बेळगाव डायोसिसने अर्थात बेळगाव धर्म प्रांताने केले आहे.
40 दिवसांचा उपवास आणि तपश्चर्येनंतर जगभरातील ख्रिश्चन बांधवांनी रविवारी वर्षातील पाम संडे या अत्यंत पवित्र अशा आठवड्यात प्रवेश केला आहे. या आठवड्यात पवित्र गुरुवार आणि गुड फ्रायडे येणार असून ईस्टर संडे या जीजसच्या पुनरुत्थानाच्या दिवशी हा आठवडा पावित्र्याचा कळस गाठणार आहे. तथापि यंदा परिस्थिती वेगळी असून कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लाॅक डाऊनमुळे हा पवित्र आठवडा दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाही यासाठी ख्रिश्चन बांधवांनी आपापल्या घरांमध्ये पाम संडे मास साजरा करावा, असे आवाहन बेळगाव डायोसीसने केले आहे. यासाठी थेट प्रसारण व्यवस्था करण्यात आली असून ख्रिश्चन बांधवांनी घरांमध्येच प्रार्थना आणि इतर धार्मिक विधी पार पडावेत असेही सांगण्यात आले आहे. धर्मोपदेशक आपापल्या चर्चमध्ये प्रार्थना विधी पार पाडत असताना थेट प्रसारण व्यवस्थेमुळे ख्रिश्चन बांधव आपापल्या घरातून या धार्मिक विधीत सहभागी होऊ शकतील.
दरम्यान, बेळगावचे बिशप डॉ. डेरेक फर्नांडिस यांनी रविवारी सकाळी कॅम्प येथील फातिमा कॅथेड्रल चर्चमध्ये मास साजरा केला. यावेळी कोव्हीड – 19 अर्थात कोरोनामुळे आपत्तीत सापडलेल्या आपल्या देशासाठी त्यांनी प्रार्थना केली.
शहरातील ख्रिश्चन बांधवांनी रविवारी टीव्ही, लॅपटॉप आदींद्वारे पाम संडेच्या चर्चमधील धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हावे. त्याचप्रमाणे कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे सामूहिक धार्मिक सभा व प्रार्थना कार्यक्रमांवर बंदी असल्याने या आठवड्यातील गुड फ्रायडे आणि ईस्टर मिड नाईट प्रार्थना रद्द करण्यात आली आहे. तेंव्हा ख्रिश्चन बांधवांनी घरात सुरक्षित राहून थेट प्रसारण व्यवस्थेद्वारे या आठवड्यातील गुड फ्रायडे आणि ईस्टर मिड नाईट प्रार्थना कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.