कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संशयित रुग्णांच्या कोरोना तपासणी अहवालांपैकी 128 जणांच्या अहवालांची प्रतिक्षा असून 20 जणांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यात सोमवार दि. 13 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 1,694 इतक्या लोकांचे वैद्यकीय निरीक्षण झाले. कोरोना विषाणू निदानासाठी एकूण 393 व्यक्तींचे नमुने प्रयोगशाळेत धाडण्यात आले आहेत. त्यापैकी पॉझिटिव्ह रिपोर्ट असलेल्या नमुन्यांची संख्या 17 असून 248 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याच्या वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवार दि. 13 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगाव जिल्ह्यात एकूण 1,694 संशयित व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. 14 दिवसांसाठी घरगुती विलगीकरण (आयसोलेशन) केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 266 झाली असून हॉस्पिटलमध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 20 आहे. आयसोलेशन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 647 आहे, तर आयसोलेशनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 761 आहे. कोरोना विषाणू निदानासाठी एकूण 393 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 17 नमुन्यांचा वैद्यकीय रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे 248 नमुने निगेटिव्ह असून उर्वरित 128 नमुन्यांचा अहवाल हाती येणे बाकी आहे.
दरम्यान, भारताबाहेरील कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तींनी अथवा कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांनी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळली नसली तरीही भारतात आलेल्या दिवसापासून 14 दिवस घरगुती विलगीकरणात रहावे, घराबाहेर पडू नये. त्याचप्रमाणे संबंधितांनी स्वतःहून नजीकच्या सरकारी हॉस्पिटल अथवा 104 हेल्थ – हेल्पलाईन कॉल सेंटरशी किंवा आरोग्य सहाय्यवाणी डीएसयू बेळगाव 0831- 2424284 येथे संपर्क साधून आपली माहिती द्यावी. नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्यावी.
खोकला अथवा शिंक आल्यास टिश्शू पेपर किंवा रुमाल तोंडावर धरावा. प्रत्येकाने आपले हात साबण लावून पाण्याने अथवा सॅनिटायझरने वारंवार स्वच्छ धुवावेत. नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रमातील सहभाग शक्यतो टाळावा, आदी खबरदारीच्या सूचनाही जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यालयाच्या सर्व्हिलन्स युनिटने आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जनतेला दिल्या आहेत.