लॉक डाऊनमुळे गोव्याच्या एका वृद्ध इसमावर बेळगावात अडकून पडण्याची वेळ आली असून परत घरी जावयाचे असल्याने गेल्या महिन्याभरात असहाय्य झालेल्या या वृद्धाने जिल्हा प्रशासनासह सेवाभावी संस्था आणि व्यक्तींना मदतीचे आवाहन केले आहे.
पणजी गोवा येथील प्रकाश वरदे हे 80 वर्षाचे इसम सध्या लॉक डाऊनमुळे मारुती गल्लीतील वृंदावन लाॅजमध्ये अडकून पडले आहेत. महिन्याभरापूर्वी काही कामानिमित्त प्रकाश हे रत्नागिरीला गेली होते. पणजी गोव्याला माघारी परत येताना बेळगावातील आपल्या मित्रांना भेटून जावे या उद्देशाने ते मारुती गल्लीतील वृंदावन लॉजमध्ये उतरले. नेमक्या त्याच वेळी देशव्यापी लॉक डाऊन लागू झाला. परिणामी महिन्यापेक्षाजास्त कालावधी उलटून गेला तरी प्रकाश वरदे यांना घरी पणजीला जाता आलेले नाही.
प्रकाश यांच्या खिशातील पैसे देखील संपले असून सध्या त्यांच्याकडे फक्त 22 रुपये असल्यामुळे ते असहाय्य बनले आहेत. गेल्या महिन्याभराच्या कालावधीत लॉजमधील कर्मचारी आपल्या जेवणातील काही वाटा प्रकाश यांना देत असल्यामुळे त्यांच्या पोटापाण्याची कशीबशी व्यवस्था झाली आहे. आपल्याला पुन्हा पणजीला पोहोचवण्याची व्यवस्था केली जावी, अशी विनंती ती वरदे यांनी प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार अधिकारी येऊन भेटूनही गेले होते.
तथापि त्यानंतर अद्यापपर्यंत कोणतीही हालचाल झालेली आहे. तेंव्हा शहरातील सेवाभावी संस्था अथवा कार्यकर्त्यांनी कृपया आपल्याला आपल्या घरी पणजी गोवा येथे पोहोचवण्याची व्यवस्था करावी, अशी कळकळीची विनंती प्रकाश वरदे यांनी केली आहे. आपल्यावर बेळगावात अडकून पडण्याची जी वेळ आली आहे त्यासंदर्भात त्यांनी “बेळगाव लाईव्ह”ला माहिती दिली.