कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यापासून सध्या वटवाघळांचे नाव चर्चेत आहे. वटवाघळांपासून कोरोना रोग होत असल्याचा आरोप केला जात असला तरी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने याचा इन्कार केला आहे. वटवाघळांपासून कोरोना रोग होत नसल्यामुळे वटवाघळांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये अथवा त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करू नये. तसे झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा वनखात्याने दिला आहे.
वटवाघळे विविध प्रकारच्या वनस्पतींच्या बीज प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावतात. तथापि सध्या वटवाघुळ यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून वटवाघळांबद्दल अफवा पसरविल्या जात आहेत. खोट्या बिनबुडाच्या अर्धवट माहितीमुळे वटवाघळे बदनाम होत असून काही भागात त्यांना मारण्याचे प्रकार होत आहेत. याची गंभीर दखल वनखात्याने घेतली आहे. तसेच वटवाघळांना त्रास देणाऱ्या अथवा त्यांना ठार मारणाऱ्यांवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या आधारे कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
शहरात अनेक ठिकाणी वटवाघळांच्या वसाहती दिसून येतात यामधील बहुतांश वटवाघळे फलाहारी असून कांही मांसाहारी आहेत. फलाहारी वटवाघळे फुलांमधील मध आणि विविध प्रकारची फळे खातात, तर मांसाहारी वटवाघळे लहान किडे व फुले खाऊन जगतात त्यामुळे नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी मदत होते.
त्याचप्रमाणे झाडांच्या बीज प्रसारात वटवाघळे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यासाठी वटवाघळांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये. बऱ्याच ठिकाणी वटवाघळांना हुसकावून लावण्यासाठी अवलंबले जात असलेले प्रकार धोकादायक आहेत. वनखात्याकडून हे प्रकार टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत.