कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरन्टाईन असलेल्या लोकांची वाढती संख्या लक्षात घेऊन यापुढे जिल्ह्यातील कोरन्टाईनचा शिक्का मारलेल्या लोकांची कोरन्टाईनची व्यवस्था त्यांच्या-त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या क्वाॅरन्टाईन सेंटरमध्ये केली जाणार आहे.
बेळगाव, रायबाग आणि हुक्केरी तालुक्यातील 68 जणांना सध्या बेळगाव शहरातील वेगवेगळ्या पाच लॉजमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. आरोग्य खाते आणि प्रशासनाकडून या 68 जणांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. या पाच लॉजच्या परिसरात असलेल्या नागरिकांनी त्यांना नागरी वस्तीतील लॉजमध्ये ठेवण्यास विरोध केला होता. यासाठी संबंधीत लॉज जवळ पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.
जिल्ह्यातील कोरोना संशयितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य खात्याकडून या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना 14 अथवा 28 दिवसांचे कोरन्टाईन (अलग ठेवणे) करण्यात येत आहे. सध्या या लोकांना बेळगाव शहरातील विविध लॉज आणि हॉटेल्समध्ये कोरन्टाईन करण्यात येत आहे. तथापि दिवसेंदिवस कोरोना संशयितांची संख्या वाढत असून पर्यायाने कोरन्टाईन केलेल्यांची संख्यादेखील वाढत आहे. परिणामी बेळगावातील डॉक्टर्स, नर्स आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे.
याव्यतिरिक्त शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भरवस्तीतील लॉज अथवा हॉटेल्समध्ये कोरन्टाईन केलेल्या लोकांना ठेवण्यास शहरवासीयांचा तीव्र विरोध आहे. तसेच कोरोना संशयितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्यास शहरात केलेली कोरन्टाईन व्यवस्था देखील अपुरी पडणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा प्रशासनाने यापुढे जिल्ह्यातील कोरन्टाईन केलेल्या रुग्णांची कोरन्टाईन व्यवस्था त्यांच्या-त्यांच्या तालुक्यात करण्याचा निर्णय घेतला आहे
जिल्हा प्रशासनाच्या तालुक्यात क्वाॅरन्टाईन सेंटर उघडण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्यात क्वाॅरन्टाईन केलेल्या व्यक्तींना आता त्यांच्या – त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या क्वाॅरन्टाईन सेंटरमध्ये राहावे लागणार आहे. परिणामी बेळगावमधील डॉक्टर,नर्स आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.