शहरातील कसाई गल्ली, कॅम्प येथील पी – 127 हा कोरोना बाधित रुग्ण उपचारांची पूर्णपणे बरा झाला असून त्याच्या दोन्ही चाचण्या निगेटीव्ह आल्यामुळे आज मंगळवारी त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.
हा रुग्ण बेळगाव जिल्ह्यात आढळलेल्या पहिल्या तीन कोरोना बाधित रुग्णांपैकी एक असून शहरात सापडलेला पहिला पॉझिटिव्ह रुग्ण होता. आज मंगळवारी त्याला डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील उपचारा अंती डिस्चार्ज मिळालेल्या कोरोना मुक्त रुग्णांची संख्या 7 झाली आहे.
गेले सलग तीन दिवस एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नसल्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 54 इतकी स्थिर आहे. यापैकी 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे आता अॅक्टिव्ह रुग्ण 46 झाले आहेत. हॉस्पिटलमधून आज मंगळवारी डिस्चार्ज मिळालेला 26 वर्षीय पी -127 क्रमांकाचा रुग्ण नवी दिल्ली येथील तबलीग मरकज धर्म सभेला उपस्थित राहून बेळगावला आल्यानंतर कोरोना बाधित आढळून आला होता. आता उपचारा अंती त्याच्या स्वॅबच्या नमुन्यांचा अहवाल दोन्ही वेळेला निगेटिव्ह आल्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तथापि घरी गेल्यानंतर शिष्टाचारानुसार त्याला 14 दिवस सक्तीने होम काॅरन्टाईन करावे लागणार आहे.
हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देतेवेळी संबंधित रुग्णाला घरी गेल्यानंतर घ्यावयाची खबरदारी याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच टाळ्या वाजून त्याच्या डिस्चार्जबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला