कोरोना रुग्णाचा हॉस्पिटलमधील ऑडिओ,व्हीडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या व्यक्तीला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे.हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णावर उपचार केले जात असून हॉस्पिटल मधील रुग्णाचा व्हीडिओ, वादग्रस्त वक्तव्य असलेली ऑडिओ,व्हीडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे समाजात गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन अनेक तर्कवितर्कांना उत आला होता.
या व्हीडिओ आणि ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल करून समाजात चुकीचा संदेश पसरवण्याचे काम केले जात होते.त्यामुळे जनतेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन सोशल मीडियावर क्लिप व्हायरल करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची पोलीस खात्याला सूचना केली होती.
ए पी एम सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या अटक केलेल्या व्यक्तीचे नाव अमीर हामजा मोहम्मदहुसेन बिडीकर वय 30 रा. रामतीर्थ नगर पाचवा क्रॉस कणबर्गी असे आहे.या व्यक्तीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या तीन रुग्णांचे व्हीडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करून गोंधळाचे वातावरण निर्माण केले होते. त्याच्यावर आय पी सी 153 अ,388,504, 505 1 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.ए पी एम सी पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांनी ही कारवाई केली.
काल जिल्हाधिकारी यांनी पोलीस खात्याला व्हीडिओ व्हायरल करणाऱ्यावर कारवाई करा असा आदेश दिला होता त्या पोलीस आयुक्तांनी देखील याची गंभीर दखल घेत अमीर हमजा याला अटक करत त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे.