शहरातील श्रीनगर येथील उद्यानासमोरील ड्रेनेज पाईपलाईन फुटून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने अस्वच्छ वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी सदर पाईपलाईन त्वरित दुरुस्त करण्याची जोरदार मागणी होत आहे.
शहरातील श्रीनगर येथील उद्यानासमोरील ड्रेनेज पाईपलाईन गेल्या 15 दिवसांपासून फुटली आहे. परिणामी याठिकाणी अस्वच्छ वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे श्रीनगर उद्यानासमोरून ये – जा करताना नागरिकांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. ड्रेनेज पाईपलाईन फुटल्यामुळे गटारांमध्ये सांडपाणी तुंबले आहे. त्यामुळे डांस व माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे. घाणीवरील माशा आणि डासांमुळे आसपासच्या घरांमधील रहिवासी त्रस्त झाले असून त्यांच्या विशेष करून लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर परिसरात निर्जंतुकीकरण मोहीम राबविली जात आहे. तथापि श्रीनगर उद्यानासमोरील 15 दिवसांपासून फुटलेल्या या ड्रेनेज पाईपलाईनकडे मात्र महापालिकेने अद्याप दुर्लक्ष केले असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. तेंव्हा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेऊन श्रीनगर येथील फुटलेली ड्रेनेज वाहिनी त्वरित दुरुस्त करण्याचा आदेश द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.