देशासह जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे लोक डाऊन करण्यात आले आहे. या परिस्थितीत अनेकांनी घरातच राहून लोक डाऊन पाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागात सुरक्षित अंतर ठेवणे म्हणजे काय रे भाऊ? असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत कोणीही दक्षता घेण्यास तयार नसल्याने पोलिसांनीही अशा नागरिकांसमोर हात टेकले आहेत, असे चित्र दिसून येत आहे.
संपूर्ण भारतात कोरोणाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण भागातील चित्र वेगळेच दिसून येत आहे. रेशन वितरण असू दे किंवा बँकेमध्ये लावण्यात आलेल्या रांगा असू दे सुरक्षित अंतर ठेवण्यात येत नसल्याने मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संसर्गजन्य रोग असल्याने तो चुटकीसरशी पसरू शकतो. मात्र याचे भान नागरिकांना नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांचा दंडकच आता त्यांना अद्दल घडेल अशी आशा व्यक्त होत.
संसर्गजन्य रोग असल्याने घरातच राहून यावर आळा घालू शकतो हे वारंवार केंद्र सरकार राज्य सरकार आणि डॉक्टरही बोंब मारून सांगत आहेत. मात्र याचे सोयरसुतक नागरिकांना दिसून येत नाही. आम्हाला काय होतंय अशाच अविर्भावात मिरवणाऱ्या नागरिकांना आता खाकीचा बांबू दाखवण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक गावात अशी अवस्था असल्याने आता कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्याची गरज व्यक्त होत आहेत.
किराणा दुकानातून, रेशन दुकान अन्यथा बँकेमध्ये पैसे करण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवण्याचे भान अनेकांना नसल्याचे दिसून येत आहे. सध्या एकत्र येण्याची परिस्थिती नसताना देखील आपल्या मनमानी कारभारामुळे अनेक नागरिक प्रचलित झाले आहेत. त्यांच्या या मनमानी कारभाराला पोलिसांनी योग्य वेळी आळा घालण्याची गरज व्यक्त होत आहे. कडोली सह अनेक परिसरात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोशल डिस्टन्स म्हणजे काय रे भाऊ असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता संबंधीताना आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे.