“कोरोना”च्या स्वरूपात मुंबईसह महाराष्ट्रावर जे संकट कोसळले आहे, या संकटातून आपण महाराष्ट्राला सुखरूप बाहेर काढून प्रगतीपथावर आणाल यात शंका नाही आणि यासाठी समस्त सीमावासीय मराठी जनता आपल्या पाठीशी आहे, अशा पाठिंब्याचे सदिच्छा पत्र मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना धाडले आहे.
कोरोना विषाणूने देशभरात विशेषता महाराष्ट्रात थैमान घातले आहे. तथापि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नांवे पाठिंब्याचे सदिच्छा पत्र पाठविले आहे. आपण आपल्या निडर व समर्पित वृत्तीने संयमाने आणि निपक्ष पणे आज महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहात याचा सीमावासीय मराठी जनतेला सार्थ अभिमान वाटत आहे. निस्वार्थी व प्रामाणिक सहकाऱ्यांना सोबत घेऊन आपले जे कार्य चालले आहे, त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला वेगळे पावित्र्य प्राप्त करून दिले आहे. महाराष्ट्र आपला सदैव कृतज्ञ राहील. आपल्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक सदिच्छा!, आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत.
आज आपण मुंबई महाराष्ट्र आणि कांही मोठ्या शहरातील कोरोना विरुद्ध जो लढा देत आहात त्यामुळे साहजिकच छ. शाहू महाराज यांची आठवण झाली. सुरुवातीच्या काळातच महाराजांवर जो प्रसंग ओढवला तसा प्रसंग आज ओढवला आहे. पण महाराज जसे यातून तावून सुलाखून बाहेर पडले, तसेच आपणही यशस्वी होणार यात शंका नाही. आपल्या कार्य शैलीने आपण साऱ्या महाराष्ट्रवरच नाहीतर सर्व भारतीयांवर छाप पाडली आहे. आजच्या सर्व परिस्थितीतून आपण महाराष्ट्राला बाहेर काढाल आणि प्रगतीपथावर आणाल यात बिलकुल शंका नाही, अशा आशयाचा तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविल्या सदिच्छा पत्रात नमूद आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्यासह मध्यवर्तीचे सदस्य आणि सीमावासीय यांच्यावतीने हे पत्र धाडण्यात आले आहे.